
बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवरील हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह सहाजणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात 15 ते 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, शहर समन्वयक अॅड. संभाजी थोरवे, कसबा विभागप्रमुख चंदन साळुंके, युवासेना विस्तारक राजेश पळसकर, पर्वती विभागप्रमुख सूरज लोखंडे, हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरप्रमुख गजानन थरकुडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, युवासेना मावळचे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, प्रभागप्रमुख रूपेश पवार यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विराज विश्वनाथ सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कात्रज चौक परिसरात काल रात्री सामंत यांच्या मोटारीवर हल्ला झाला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरप्रमुख मोरे यांच्यासह सहाजणांना आज अटक करून न्यायालयात हजर केले.
अधिक तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली, तर राजकीय आकस व दबावातून आरोपींवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे सरकारी कर्मचारी नाहीत. त्यामुळे कलम 353 लागू होत नाही. बबनराव थोरात हे घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांना मुंबईवरून अटक केली, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.




























































