
शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी विधिमंडळात आपल्याला हक्काचा माणूस हवाच आहे, पण केवळ विधान परिषदेतच नव्हे तर महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेतून भारतीय जनता पक्षाला तडीपार केल्याशिवाय शिक्षकांना न्याय मिळणार नाही, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षकांना केले. भाजपला तडीपारीची नोटीस आपण दिलीच आहे. आता त्यावर शिक्षकांची सही बाकी आहे, असे ते म्हणाले.
शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिक्षकांनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी ‘अब की बार….भाजप तडीपार’ अशा घोषणा दिल्या.
शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे यांच्यासह शेकडो शिक्षक शिवसेनेत
शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांच्यासह कार्यवाह प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सलीम शेख, माजी मुंबई विभाग अध्यक्ष शशिकांत उत्तेकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र खरात, ज्युनियर कॉलेज राज्य अध्यक्ष आर. बी. पाटील यांच्यासह शिक्षक भारतीशी संलग्नित शेकडो शिक्षकांनी राज्य शिक्षक सेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्यासह शिक्षक सेना मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण, ज्युनियर कॉलेज अध्यक्ष विशाल बावा, नरेंद्र शिंदे, जितेंद्र चौधरी, मानसी चाळके, तेजींदर काwर, भाऊ घाडगे, प्रभाकर भोईटे, अरविंद नाईक, जगदीश भगत, मंगेश पाटील आदी उपस्थित होते.
सध्याच्या राजकारण्यांना सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची गरज
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुसंस्कृतपणा दावणीला बांधलेल्या सध्याच्या राजकारण्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या ज्या पद्धतीने राजकारण चाललेय ती आपली संस्कृती नसून राजकारण्यांना सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची गरज आहे. शिक्षक मेहनत करून भावी पिढी घडवतात, ती जर अशी नासणार असेल आणि नासक्या, कुजक्या लोकांच्या हाती जाणार असेल तर शिक्षक आणि शिक्षणाचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिक्षकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी शिवसेनेची
शिक्षकांनी शिक्षकांचेच काम केले पाहिजे. त्यांना तांदूळ निवडणे, खिचडी वाटणे अशा इतर कुठल्याही कामाला जुंपता कामा नये, नाहीतर ते शिकवणार कधी असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शिक्षकांच्या मुद्दय़ावर काहीजण हातपाय मारतात पण पुढे काहीच करत नाहीत, असा टोला हाणताना आता शिक्षकांसाठी शिवसेना लढेल आणि जिंकल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी, असे ठाम आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
सुजलाम् महाराष्ट्र सुजाणही करायला हवा
पह्डापह्डीचे राजकारण खूप चालले आहे. काहीतरी स्वार्थाने विरोधी पक्षातून सत्ताधाऱयांकडे येणारे बरेच असतात. पण आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आलात याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिक्षकांचे काwतुक केले. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झालाच आहे, पण तो सुजाण करण्यासाठी शिक्षकांचा उपयोग करावा लागेल, असे ते म्हणाले. शिक्षक मतदारसंघाकडे शिवसेनेचे दुर्लक्ष झाले होते. शिक्षकांचे विषय विधिमंडळात कुणीच नीट मांडत नाही. ते प्रभावीपणे मांडण्यासाठी आपल्याला हक्काचा आवाज म्हणून शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे ज. मो. अभ्यंकर यांना विधान परिषदेत पाठवायचे आहे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
























































