महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून रवाना, अयोध्येत स्वागतासाठी अभूतपूर्व तयारी

1801

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशात आणि खासकरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शुक्रवारी रात्री अयोध्येसह उत्तर प्रदेशातील काही भागात पाऊस पडला होता. मात्र हा पाऊस शिवसैनिकांचा उत्साह कमी करू शकलेला नाहीये.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे या दौऱ्यानिमित्ताने गेले तीन दिवस अयोध्येत तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्येत येत असल्याने शिवसैनिकांसह तिथल्या स्थानिकांमध्येही या दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील तसेच उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱयांनी  अयोध्या भगवेमय केली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रालाच काय, संपूर्ण देशाला आनंद झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा काकणभर जास्त आनंद अयोध्यावासीयांना झाला… मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला रामलल्लांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱयाबाबत स्थानिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

सामना अग्रलेख – पाठीशी श्रीराम आहेतच!

भगव्या पताका, भगवे होर्डिंग्ज, भगवा जल्लोष… अयोध्येची पवित्र भूमी भगव्या तेजाने लखलखून गेली आहे. निमित्त आहे, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे! या दौऱ्याच्या निमित्ताने अयोध्येचा माहौलच भगवा झालाय… लखनौ ते अयोध्येपर्यंतचा रस्ता शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेला आहे… ‘सियावर रामचंद्र की जय…’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा महागजर होतोय. जागोजागी स्वागताचे होर्डिंग्ज लागले आहेत. हा रस्ता जणू ‘शिव’मार्गच बनला आहे.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हा रामलल्लांचा आशीर्वाद!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाच्या निमित्ताने भगवे चैतन्य अवतरले आहे. लखनौ ते अयोध्येपर्यंतचा तब्बल दीडशे कि.मी. रस्ता भगव्या होर्डिंग्जने लखलखून गेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेले शिवसैनिकांचे जथेच्या जथे शुक्रवार सकाळपासूनच अयोध्येकडे निघाले… गळय़ात भगवे रुमाल, भगवे टिळे आणि जयघोष यामुळे आसमंत निनादून गेला आहे.

अयोध्येच्या आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोलाचे योगदान. आजही अयोध्येच्या घराघरांत शिवसेनाप्रमुखांचे नाव आदराने घेतले जाते. अयोध्या खटल्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख आले होते. तेव्हाही अशीच तोबा गर्दी उसळली होती. शिवसेनाप्रमुखांचे पुत्र उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे अयोध्यावासीयांच्या आनंदाला भरते आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या