राजकारण न करता पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा! उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण झाली असून आभाळ फाटलंय, अभूतपूर्व असं संकट ओढवलंय. अशा परिस्थितीत कोण काय करतंय यापेक्षा आपण काय करावं हे अधिक महत्त्वाचं आहे. या आपत्तीत कोणीही राजकारण न करता पूरग्रस्तांच्या मागे ठामपणे उभे रहा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

शिवसेनेची शिवसहाय्य पथके आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाली. यावेळी शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, या आपत्कालीन स्थितीत कोण कमी पडतंय, जास्तं पडतंय हे वाद घालण्यात अर्थ नाही. शिवसेना म्हणून आम्ही काम करतोय. पुराच्या वेढय़ात अडकलेल्यांना वाचवणं आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं आवश्यक आहे. हे काम शिवसेनेने हाती घेतलं असून शिवसेनेची पथकं मदतीसाठी रवाना झाली आहेत. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिकांनी मदतकार्यात स्वतःला झोकून दिले आहे.

वातावरण बदलत आहे. अचानक पाऊस कोसळतो आणि सर्वत्र दैना उडते. यातून मार्ग काढण्यासाठी तज्ञांची मदत घ्यायला हवी. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा निर्माण करायला हवी, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. केवळ कोरडी सहानूभूती दाखवायला पूरग्रस्त भागाच्या दौऱयावर जाणार नाही. तिथल्या लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत. पूरग्रस्त भागांत वैद्यकीय पथके, व्हेटरिनरी डॉक्टर्स तसेच जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यावर शिवसेनेचा भर आहे. पूर ओसरायला काही काळ लागेल. अशा काळात रोगराई पसरू नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी शिवसेनेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना उपनेते-केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार सुनील प्रभू, आमदार संजय पोतनीस, विलास पोतनीस, शिवसेना सचिव सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

मदत पोहोचली नसेल तो भाग सांगा – आदित्य ठाकरे
पूरग्रस्त भागात शिवसेना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र तरीही एखादा भाग मदतीपासून वंचित असल्याचे आपल्या लक्षात आल्यास ते आम्हाला कळवा, तिथे मदत पोहोचविली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पूरग्रस्त भागात माणसांबरोबरच प्राण्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागात 70 व्हेटरिनरी डॉक्टर शिवसेनेने पाठविले आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक लसी, औषधे वैद्यकीय मदत आधीच पूरग्रस्त भागांत पोहोचविण्यात आली आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेही जबाबदारी सांभाळत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पंचगंगेचे पाणी मराठवाडय़ात वळवता येईल का, या प्रश्नावर त्यांनी सध्या पंचगंगेचे पाणी दूषित झाले असून ते वळवता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

भीषण संकटात निवडणुकांचा विषय डोक्यात तरी कसा येतो?
महापुरामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी होत असल्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, इतकं भीषण संकट ओढवलं असताना निवडणुकांचा विषय कुणाच्या डोक्यात तरी कसा येतो हेच कळत नाही. पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी किंवा नाही या वादात न पडता आता जे काही करणं गरजेचं आहे ते करायला हवे. अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत मत व्यक्त करताना कर्नाटक सरकार जर काही दुर्दैवी गोष्टी करीत असेल तर ते सत्य उघड होईलच, पण सध्या मदत पोहोचवणं गरजेचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘चिंतामणी’चा जयकार!
शतकमहोत्सव साजरे करणाऱया चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाच्या बाप्पाचे रविवारी धूमधडाक्यात आगमन झाले. बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी मुंबईसह आसपासच्या भागातून हजारो भाविक मेगाब्लॉकची पर्वा न करता सकाळपासूनच लालबागमध्ये दाखल झाले होते. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या जयजयकाराने संपूर्ण लालबाग-परळ परिसर दुमदुमून गेला होता.