सौ सोनार की एक लोहार की! सत्तांधांना फोडून काढणार!! वाघाची डरकाळी घुमणार…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहा दशकांची सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा अस्सल, दणदणीत आणि खणखणीत दसरा मेळावा उद्या होत आहे. या मेळाव्यासाठी शिवतीर्थ सज्ज झाले असून अवघे दादर भगवेमय झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱयातून आणि देशभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होऊ लागले असून यंदाच्या मेळाव्यात एकनिष्ठ शिवसैनिकांचा विराट जनसागरच शिवतीर्थावर उसळणार आहे. या अतिविराट गर्दीच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी विचारांचे सोने शिवसैनिकांच्या पदरी टाकणार आहेत. त्याच वेळी सत्तांध भाजप आणि मिंधेंनाही ते पह्डून काढणार आहेत. सौ सोनार की एक लोहार की… असाच हा तडाखा असेल. त्यामुळेच उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे अवघ्या हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपायुक्त, 100 अधिकारी, 600 अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ा, क्यूआरटीची पथके असा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी आवश्यक ते नियोजन केले आहे.

दैवत आपले ठाकरे!

दैवत आपले ठाकरे… हे झंझावाती गीत आज रिलीज झाले. ‘गद्दारी करून, आपण कधी पळत नाही, फेकलेले तुकडे आपण कधी गिळत नाही’, अशी तोफ या गीतातून गद्दारांवर डागली आहे. ‘पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपले ठाकरे, आण-बाण-शान ठाकरे, दैवत आपले ठाकरे!’, अशी कृतज्ञता शिवसैनिकांनी या गीतातून व्यक्त केलीय.

सोनेवाटप, शस्त्रपूजन आणि रावण दहन

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन यंदाच्या दसरा मेळाव्यातही घडणार आहे. सोने वाटप, विधीवत शस्त्रपूजन झाल्यानंतर रावण दहनही केले जाणार आहे.