
सामना प्रतिनिधी । मुंबई
जिथे इंदिराजींची आणीबाणी आपण उखडून फेकली, इंग्रजांची गुलामगिरी उखडून फेकली, तिथे चोरपावलांनी दुसरी आणीबाणी येतेय अशा फालतू चर्चा कसल्या करता? शेवटी जनता ही सार्वभौम आहे हे लक्षात ठेवा. प्रसंगी आपण तुटून पडलो तरी चालेल, पण ही आणीबाणी उखडून टाकायलाच हवी, असे जबरदस्त आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान योजनेचा शुभारंभ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. ते म्हणाले, आपल्या देशात तिसरी आणीबाणी चोरपावलांनी येतेय का अशी कुणकुण आहे. पूर्वी मीडिया सरकारवर लक्ष ठेवत होता. आता काळ असा आलाय की, सरकार मीडियावर लक्ष ठेवतेय. पुण्यप्रसून वाजपेयी यांनी शेतकऱयांच्या दुप्पट उत्पन्नाच्या केंद्र सरकारच्या घोषणेचा पाठपुरावा केला. या योजनेचं भांडं फोडल्यानंतर आपण काय केलं? कठीण आहे म्हणालो, पण तेही मऊपणाने! शिवसेनाप्रमुख जेव्हा टीका करायचे तेव्हा पत्रकार सगळे एकवटायचे. सांगायचे, हे पत्रकारांच्या विरुद्ध आहेत. मग, आता जे चाललंय ते आपण का सहन करतोय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
लेखणीला गंज चढवण्यात राज्यकर्ते हुशार
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाच्या काळात आचार्य अत्रे यांनी मोरारजी देसाईंना प्रसंगी ‘खुन्या मुरारी’ म्हणण्यासही मागेपुढे पाहिले नाही. आपल्याला 10 टक्क्यांचे घर मिळेल म्हणून ते गप्प बसले नाहीत. तलवार म्हणजे लेखणी. या लेखणीला गंज कसा चढेल हे पाहण्यात राज्यकर्ते हुशार असतात. आपुलकीचं खोटं पाणी मारीत त्या तलवारी गंजवून टाकल्या की मग त्या लेखणीतून लिखाण कसे करणार? तेव्हा आपली लेखणी तलवारीप्रमाणे धारदार असायला हवी, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.
पत्रकारितेला ‘नवशक्ती’ मिळो !
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी, खांडेकर यांची पत्रकारिता आदर्शवत असून त्यांच्या मार्गदर्शनातून पत्रकारितेला ‘नवशक्ती’ मिळो, अशा शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्य व पत्रकार उपस्थित होते.
राजकारण नको!
पत्रकार म्हटल्यानंतर लोकमान्य टिळक, आगरकर यांचे ऋण मानलेच पाहिजेत. महात्मा फुले, लोकमान्य टिळकांनी केलेल्या कार्याचा विचार न करताच त्यांच्या पगडय़ा घेऊन मिरवायला लागतो, पण पगडय़ांचं राजकारण करू नका. लोकमान्यांनी आपली लेखणी आणि कर्तृत्वाने जे केलं ते करून दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तलवारीची ताकद तुमच्या लेखणीत असायला हवी. दिशाहिन समाजाला दिशा दाखवण्याची आवश्यकता आहे. मी पत्रकार आहे तोपर्यंत माझ्या डोळ्यांदेखत हे घडू देणार नाही, ही हिंमत दाखवायला हवी असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मराठा’ आणि ‘सामना’ अभ्यास केल्याशिवाय पत्रकारितेला पूर्णत्व नाही
– सुकृत खांडेकर
आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ आणि दै. ‘सामना’ने पत्रकारितेत झंझावात निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दै. ‘मराठा’मुळे राज्यासह देश ढवळून निघाला. आजही दै. ‘सामना’त काय आहे याबाबत दिल्लीतही चर्चा असते. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच चित्र लोकांसमोर येते. राष्ट्रीय पातळीवर दै. ‘सामना’च्या अग्रलेखांची ताकद असून सर्व भाषांमध्ये हा अग्रलेख अन्य वृत्तपत्रे व मीडियाच्या माध्यमातून दिल्लीत वाचायला मिळतो. तेव्हा अत्रे आणि ठाकरे तसेच ‘सामना’ आणि ‘मराठा’चा अभ्यास केल्याशिवाय पत्रकारितेला पूर्णत्व नाही, असे सुकृत खांडेकर म्हणाले.
























































