
मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार गावात शेतकरी बांधवांशी संवाद साधला. जर जमिनीचे पंचानामे होणार नसतील तर मग आपल्याला या दगाबाज सरकारचा पंचनामा करावा लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यातील महायुती सरकारला दिला. दगाबाज सरकारचा पंचनामा असा एक कार्यक्रम घ्या आता, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे जे अधिकार आहेत ज्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये पंचमाने करण्याचे आणि मदत वितरीत करण्याचे अधिकार आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा. त्यांना त्रास नाही द्यायचा, शिवी नाही द्यायची. जाऊन बसायचं आणि सांगायच आम्ही सगळे आंगठे घेऊन आलो आहोत. कुठे उमटवू सांग, तू म्हंटशील तिकडे अंगठा उमटवतो. त्यांना त्रास नाही द्यायचा त्यांचा सत्कार करायचा आणि जे काही सोयाबीन वैगेरे सडलं आहे ते त्यांना सप्रेम भेट द्यायचं.
एका आजींनी मला सडलेले तांदुळ, किडलेले गहू दाखवले. त्याचाच भात करा, त्याचीच चपाती करा शेतात जे काही राहिलं असेल त्याचंच कायतरी बनवा आणि त्यांना डबा घेऊन जा. त्यांना खाऊपिऊ घाला. पण त्यांना सांगा तुला सगळं देतो, पण आमचं काम झाल्याशिवाय तुला बाहेर सोडणार नाही.
रझाकारांपेक्षा भयानक हे सरकार आमच्याशी वागतंय
मोर्चे काढ, चक्का जाम करा आणि म पोलीस आपल्यावरच लाठीचार्ज करणार. त्यांना वरून आदेश येणार त्यामुळे ते तरी काय करणार. शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आहे. तिथे सगळे शेतकरी म्हणतायत की, साहेब आम्ही न्याय मागायला गेलो तर आमच्यावरच लाठ्या मारतायत. एक शेतकरी म्हणाला, रझाकारांपेक्षा भयानक हे सरकार आमच्याशी वागतंय. रझाकारांना का घालवलं? आपला देश स्वतंत्र झाला, अन्याय अत्याचार खूप होत होता म्हणून त्यांना घालवलं. आता ते रझाकार गेले आणि हे आले. हा अन्याय आपण सहन करतोय.
भारत मातेमध्ये माझी ही माता तुझ्या नतदृष्टपणामुळे आत्महत्या करतेय
मुख्यमंत्री म्हणतायत 30 जूनला कर्जमाफी करणार, तुमची तयारी असेल तर तुम्ही थांबा. पण तोपर्यंत काय करणार आहात? खरीपाचं कर्ज कसं फेडणार आहात? रब्बीच नवीन कर्ज मिळणार नाही, त्याचे हाप्ते कसे फेडणार आहात? तुम्हा सगळ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना सांगतो की, मी सांगतो यांना (शेतकऱ्यांना) 30 जूनपर्यंत थांबा. पण बँका थांबतील का? बँकाचा तगादा थांबतोय का? राजूरामध्ये पूर्व विदर्भात एका 68 वर्षाच्या यशोदा राठोड या महिलेने बँकेने कर्जासाठी तगादा मागे लावला म्हणून आत्महत्या केली. महिला आत्महत्या करतायत. दुसरीकडे हे लोकं काय म्हणतायत, भारत माता की जय, पण त्याच भारत मातेमध्ये माझी ही माता तुझ्या नतदृष्टतेपणामुळे आत्महत्या करतेय. कसे यांना भारत मातेचे आशिर्वाद मिळतील.
40 मशी व्हाहून गेल्या, आता काय म्हशीचे आंगठे पाहिजे तुम्हाला
40 म्हशी त्यांच्या वाहून गेल्या. मात्र, सरकारचा नियम सांगतो तीन जणावरांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल. 40 दुभती जणावरं वाहून गेली. हे (फोटो) दाखवल्यानंतरसुद्धा आणखी काय करायचं, काय दाखवायचं त्यांना, कसले पुरावे द्यायचे? का म्हशीचे आंगठे पाहिजे तुम्हाला. सरकारचा नियम सांगतो तीन जणावरांचा. तो सुद्धा नियम आता बदलला आहे, मात्र, अजूनही पैसे मिळत नाहीयेत. कोणाच्या म्हशी, कोंबड्या, शेळ्या, जमीन, घरं वाहून गेलीयेत. आख्खं आयु्ष्य वाहून गेलेलं आहे. किती नुकसान भरपाई देणार आहाता.
शेतकरी म्हणजे अजित दादाचा पोरगा नाही
अजित पवार म्हणतात सतत तुम्हाला फुकटचं पाहिजे. या म्हशी वाहून गेल्या, जमीनी वाहून गेल्या ते काय फुकटंच होतं का. आणि हा शेतकरी म्हणजे काय अजित दादाचा पोरगं नाहीये, त्याला फुकटची जमीन मिळायला. शेतकऱ्यांना सांगतायत तुम्ही हातपाय हालवा. पण तुम्ही भलतसलतं तिकडे हलवतं बसलाय, त्यामुळे सगळे भ्रष्टाचारी तुमच्या डोक्यावर बसलेत. सगळे भ्रष्टाचारी झालेत.
मी परत मराठवाड्यात येणार आहे
शिवसेना म्हणून काय करायचं ते मी करणार. या आपत्तीच्या दरम्यान तिसऱ्यांदा मी मराठवाड्यात आलो आहे. परत मराठवाड्यात मी येणार आहे. पण परत जेव्हा मराठवाड्यात येईल तेव्हा तुम्ही सर्वांनी सरकारचा पंचनामा घेऊन उभं असलं पाहिजे, तर मी येणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


























































