
महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज मिरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नुकताच झालेला मंत्र्यांचा राजीनामा, डान्स बार, ड्रग्सचे व्यवहार अशा मुद्द्यांना हात घालत सत्ताधाऱ्यांना चांगलंच झोडून काढलं. ‘कालच एका मंत्र्याचा राजीनामा झाला, आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालताहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसंच ड्रग्सचा व्यवहार करणाऱ्यांना तुम्ही मत देणार का? मुलाबाळांचं आयुष्य त्यांच्या हाती देणार आहोत का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी जनतेला विचार करण्याचं आवाहन केलं आहे.
‘मातोश्री’ येथे बोलताना राजकारणासाठी माणसं लागतात. पण ती माणसं कशी पाहिजेत? गुंड सुद्धा चालतील… ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालताहेत… आणि ज्यांचं नाव याच्याशी जोडलं जातं… तुमच्या पर्यंत बातमी आली ना आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. अरे हे कोणतं राज्य आहे? कुणासाठी राज्य आहे. याच्या आधी जे अधिवेशन झालं त्यावेळी विधिमंडळ अधिवेशनात डान्स बारचा विषय पुराव्यानिशी बाहेर काढला, अवैधरित्या खाणींचं उत्खनन चाललं आहे ते बाहेर काढलं सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं. आता सुद्धा हा जो काही ड्रग्जचा कारखाना आहे तो सुषमा ताईंनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला आहे तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत, गृहमंत्री देखील ते स्वत:च आहेत अगदी केंद्रीय मंत्र्यांकडे देखील हे सगळे पुरावे निवेदन देत आहोत. काय करताहेत ते बघायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला की, तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असला तरी विचारतो की आपल्या महाराष्ट्राची मुलं नशेच्या पदार्थांच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणाऱ्यांना आणि ते धंदे करणाऱ्यांना मत देणार आहोत का? आपल्या मुलाबाळांचं आयुष्य त्यांच्या हाती देणार आहोत का? हा ज्याचा त्याने विचार करायचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री संदिप तिवारी, राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष आझाद पटेल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. pic.twitter.com/cviDv3GbBt
— Saamana Online (@SaamanaOnline) December 19, 2025






























































