90 लाख शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित, उद्धव ठाकरे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी

1192
uddhavji-new-photo11

पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईच्या लाभापासून राज्यातले जवळपास 90 लाख शेतकरी वंचित असल्याची धक्कादायक आकडेवारी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सादर केली आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान पीक विमा योजना आणि त्यातील त्रुटींवर बोट ठेवत पीक विमा कंपन्यांना पुन्हा एकदा इशारा दिला. ज्या पात्र शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांना जर ती वेगाने मिळाली नाही तर शिवसेना चर्चेचे रुपांतर आंदोलनात करेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर एक मोर्चा काढला होता. शिवसेनेने या कंपन्यांना 15 दिवसांची मुदत दिली होती. या मोर्चानंतर शिवसेनेचे खासदार पंतप्रधानांना भेटले आणि योजनेत सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणी करणारे पत्र त्यांच्याकडे सोपवले. शिवसेनेने तालुका पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू केली होती. गेल्या वर्षी 2018 खरीपाच्या मोसमात 1 कोटी 44 हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज भरले होते. ज्यात 53 लाख शेतकरी पात्र ठरवले गेले तर 90 लाख अपात्र ठरवले गेले. शिवसेनेने पीक विम्याचा विषय उचलून धरल्यानंतर 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटींची भरपाई मिळाली असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. उर्वरित शेतकऱ्यांनाही भरपाई मिळत असून तिचा वेग वाढावा यासाठी शिवसेना पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. 90 लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवल्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना देण्यासाठीचे जमा झालेले जवळपास 2000 कोटी हे नफा म्हणून जमा करून घेतले. या पीक विमा योजनेमध्ये हफ्त्यातील 2 टक्के रक्कम शेतकरी भरतो आणि उरलेली रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते. विमा कंपनी यामध्ये पैसा टाकत नाही. म्हणजेच 100 टक्के पैसा हा करदात्यांचा आहे. असं असतानाही विमा कंपन्यांनी 2 हजार कोटींची रक्कम नफा म्हणून जमा केली आहे. यावर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना आहे ती विमा कंपनी बचाव योजना नाही. गावागावात हफ्ते गोळा करताना एजंट फिरतात, नुकसानभरपाईच्यावेळी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कोणी सापडत नाही ही शेतकऱ्यांची खंतही उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.

आपली प्रतिक्रिया द्या