तू खेळत रहा, कसलीही चिंता करू नकोस!

74

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आशियाई क्रीडा स्पर्धांत पदक जिंकणारी महाराष्ट्राची खेळाडू श्वेता शेरवेगार हिला शुक्रवारी गौरविण्यात आले. यावेळी तू फक्त खेळत रहा, कसलीही चिंता करू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी तिचे कौतुक करतानाच मनोधैर्यही वाढवले.

श्वेताला सेलिंग या धाडसी खेळामध्ये खेळण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तिच्या आईवडिलांचेही कौतुक केले. शिवसेना भवन येथे श्वेताने उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी श्वेताच्या आईवडिलांसह माजी नगरसेविका यामिनी जाधव यांचीही उपस्थिती होती.

युवा पिढीला घडवणार
माझगाव ताडवाडीत राहणाऱ्या श्वेताने आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न बाळगले आहे. याचसोबत मुंबईत सेलिंगसाठी क्लब सुरू झाल्यास तेथे युवा पिढीला घडवण्यासाठीही ती तत्पर असणार आहे. भविष्यात सेलिंग या खेळातून मुंबईसह महाराष्ट्राला पदक विजेते खेळाडू मिळावेत यासाठी ती प्रयत्न करणार आहे.

न्यायालयीन लढाई जिंकली अन् पदकही
श्वेता शेरवेगार व वर्षा गौतम यांनी आशियाई क्रीडा स्पर्धांत सेलिंग या खेळामध्ये रौप्यपदक जिंकले आणि देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रुबाबात फडकवला. यावेळी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या खेळाडूंना न्यायालयात जावे लागले होते. त्यांच्याऐवजी आशियाई सेलिंगमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी पाठवण्यात येणार होते, पण श्वेता व वर्षाने न्यायालयाची लढाई जिंकत मैदानातही बाजी मारली आणि आपलीच निवड योग्य असल्याचे दाखवून दिले.

सेलिंगपटूंसाठी खूशखबर
सेलिंग हा खरेतर महागडा खेळ. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील युवकांची या खेळातील संख्या तशी तोकडीच. पण मुंबईत या खेळासाठी एक क्लब सुरू करण्यासाठी पाऊल उचलण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सेलिंग या खेळाकडे करीअर म्हणून पाहणाऱ्यांना मुंबईतच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यांना परदेशात जाण्याची गरज भासणार नाही.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न
शिवसेनेकडून सर्व प्रकारची मदत श्वेताला करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला सरकारी नोकरी मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे.

summary- uddhav thackeray praised shweta shervegar

आपली प्रतिक्रिया द्या