
सामना ऑनलाईन । सांगली
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ ईश्वरपुरात धडाडणार आहे. ईश्वरपुरातील खुले नाटय़गृहाच्या भव्य पटांगणात सायंकाळी 6 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी झाली असून ईश्वरपूर परिसरातील वातावरण भगवेमय झाले आहे. या जाहीर सभेतून धैर्यशील माने यांच्या विजयाचा संकल्प सोडला जाणार आहे.
या सभेसाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ईश्वरपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आदी उपस्थित राहणार आहेत.



























































