दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेकडून 27 ट्रक अन्नधान्य रवाना; उद्धव ठाकरे यांनी दाखवला भगवा झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रात दुष्काळ अक्राळविक्राळ रूप धारण करतोय. या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या घरात शिवसेना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार आहे. जरी शिवसेनेने अयोध्येचा मुद्दा घेतला असला तरी मंदिरातला दिवा पेटण्याआधी, शेतकऱ्यांच्या घरातली चूल पेटवणं हेसुद्धा कर्तव्य आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. अन्नधान्यांनी भरलेल्या 27 ट्रकना उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा दाखवला आणि हे ट्रक दुष्काळग्रस्त गावांच्या दिशेने रवाना झाले.

वांद्रे येथील लीलावती रुग्णालयासमोरील मैदानात अन्नधान्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले 27 ट्रक सज्ज झाले. दुष्काळग्रस्त भागात निघालेले हे ट्रक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रवाना झाले. दुष्काळाची परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. या मदतीच्या माध्यमातून त्यांच्या घरातली चूल पेटती राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना प्रतोद आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर आदी उपस्थित होते.

सिद्धेश कदम यांचा पुढाकार
युवासेनेने अमरावती, बुलढाणा, परभणी, संभाजीनगर, अकोला, हिंगोली, जालना, बीड, लातूर, वाशीम, नांदेड, धाराशीव आणि यवतमाळ अशा 13 जिह्यांमधील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी हे अन्नधान्य रवाना केले. प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी 15 किलो गहू, तांदूळ, 5 लिटर गोडेतेल, 5 किलो साखर, 3 किलो हरभरा डाळ, दोन किलो रवा, मैदा, तीन किलो डालडा, उटणे आणि मोती साबण अशा गृहउपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. युवासेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश रामदास कदम यांनी पुढाकार घेतला.

summary- uddhav thackeray shown flag to trucks for drought areas