सिल्लोडला मका प्रक्रिया प्रकल्प, कॉटन हब उभारणार! उद्धव ठाकरे यांची घोषणा

837

राज्यात गोरगरिबांची काळजी घेणारे महायुतीचे सरकार येणार असून, रोजगारासाठी कुणावरही बाहेरगावी जाण्याची वेळ येऊ नये यासाठी तालुक्यातच औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मका प्रक्रिया प्रकल्प आणि कॉटन हब तातडीने उभारण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना-भाजपा-रिपाइं अ-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सिल्लोड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

सभेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, राजू राठोड, अवचित वळवळे, जि.प.उपाध्यक्ष केशव तायडे, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, दिलीप मचे, सुदर्शन अग्रवाल, भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मच्छिंद्र पाखरे, भाजपचे उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयसिंग राजपूत, नगराध्यक्षा राजश्री निकम, मंगला तायडे, दीपाली भवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर उपस्थित जनसमुदायाला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, गरिबाला स्वस्तात जेवण मिळावे यासाठी 10 रुपयांमध्ये जेवण, एक रुपयामध्ये वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देणार म्हणजे देणारच. या ठिकाणी अपक्ष व बंडखोरांनी मिळून एक उमदेवार उभा केला आहे. भाड्याच्या पायावर उभा राहणारा हा उमेदवार चालणार आहे का? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित केला.

राज्यात दीड कोटी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढला होता. त्यापैकी 90 लाख शेतकरी विमा कंपनीने अपात्र ठरविले होते. तर उर्वरित शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक नाही असे कारणे देऊन विमा देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्यानंतर अकराशे कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगताच उपस्थितांनी ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

दोन घासाच्या आड कशाला येतो
शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात गोरगरिबांना दहा रुपयांमध्ये जेवण देण्याची घोषणा केली आहे. या ठिकाणी बंडखोरांच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवाराला सांगा गोरगरिबांना स्वतात जेवण मिळत असताना त्याच्या दोन घासामध्ये का उभा राहतो.

आमचे पाकिस्तानशी भांडण
आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही. आमचे भांडण पाकिस्तानशी आहे. पाकिस्तान आपल्याला संपविण्याची भाषा करतोय, त्याच्यात एवढी हिंमत नाही. युद्ध झाले तर पाकिस्तान शिल्लक राहणार नाही. पाकिस्तान अनुबॉम्ब टाकण्याची भाषा करतो. त्याने तो टाकला तर हिंदू व मुस्लिम दोघांच्या घरावर पडू शकतो पाकिस्तान भेदभाव करीत नसेल तर आपण का आपसात भांडत बसतो, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

शहराचा पाणी प्रश्न मिटेल
सिल्लोड शहराचा पाणी प्रश्न अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. तो कायमस्वरूपी सुटण्यासाठी आमदार सत्तार यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. या शहरासाठी जलसंजीवनी देणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पातील जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे आले असून दिवाळीनंतर शहरवासीयांना भरपूर पाणी मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मागदर्शन करताना म्हणाले की, आमदार सत्तारसारखा चांगला माणूस शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे सिल्लोड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होऊ द्या. जिल्हाप्रमुख दानवे म्हणाले की, अनेक वर्षे आमदार सत्तार यांचे शेपूट धरून फिरणारे आज विरोधात उभे राहिले आहेत. मात्र हा छत्रपतींच्या विचारांचा मावळा असून, तो तुम्हाला माती चारल्याशिवाय राहणार नाही.

गर्दी उसळली, रस्त्यावर रांगा
ऑक्टोबरच्या भरउन्हात आयोजित या सभेला सिल्लोड व परिसरातून हजारो नागरिक आले होते. उपस्थित आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहणारा होता. महायुती शिवसेनेचा जयघोष सुरू होता. मैदान गच्च भरल्याने अनेकांनी रस्त्यावर, झाडावर, गच्चीवर उभे राहून पक्षप्रमुखांचे भाषण ऐकले. गर्दीचा अंदाज आल्याने रस्त्यावर चार ठिकाणी एलईडी स्क्रीनवर सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या