अबकी बार भाजप तडीपार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला राम राम ठोकत रविवारी नवीन पक्ष स्थापन केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. या पक्षाच्या धारावीतील पहिल्या सभेला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं.

लोकांना वाटतंय की समाजवादी व हिंदुत्ववादी हे आता एकत्र कसे. देशाला सध्या लढवय्यांची गरज असताना कपिलजींनी पक्ष काढला आहे. आता ही लढाई होणार आहे की माजवादी आणि समाजवादी अशी होणार आहे. आता तुम्हाला माजलेली लोकं हवी आहेत की तुम्हाला समजणारी लोकं हवी आहेत ते तुम्ही ठरवायचे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”नितीश कुमार यांनी सर्वात आधी भाजप विरोधात आघाडी केली. तेच आमच्या घरी आले होते. कपिलजी आजही तुमचे बिहारमध्ये संबंध आहेत. आजही युट्युबवर मोदीजींचा एक जुना व्हिडीओ फिरत आहे. मोदीजींनी बिहारमधील एका सभेत लोकांना विचारलं होतं की बिहारला किती कोटी देऊ? पन्नास हजार कोटीने बिहारचे काही होणार नाही, अजून देऊ का? साठ हजार कोटी देऊ, सत्तर हजार असं करत करत नव्वद हजार कोटीवर बोली थांबली त्यानंतर मोदींनी सव्वा लाख कोटी जाहीर केले. त्यातील किती कोटी आले ते नितीश कुमारांनी जाहीर करावे. तेवढे आले असतील तर आम्हीही तुमच्यासोबत येऊ. मोदीजींची आता फसवा फसवी सुरू आहे. वेगवेगळी रुपं घेऊन ते समोर येतात. दोनदा आमची फसगत झाली. आम्हीही मोदीजींच्या भूलथांपांना बळी पडलो. पदरात काय पडलं आमच्या. नुसतं नामांतरण करणं सुरू आहे. दोन शहरांचं नामांतरण मी केलंय. अच्छे दिन आयेंगे, 15 लाख अकाऊंटवर येणार अशा घोषणा केल्या होत्या. ते तर जुमला होता. आता त्याला नाव दिलंय की गॅरंटी. आता भाजपात या तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही मोदी गॅरंटी आहे असे सांगितले जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नाहीए. त्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. ”भाजपने 195 लोकांची यादी जाहीर केली. त्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही. आम्ही जेव्हा भाजपसोबत एकत्र आलो तेव्हा आम्हाला नरेंद्र मोदी अमित शहा यांची नावं माहित नव्हती. प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांनी आम्हाला ओळख करून दिली. त्यानंतर जे आले ते नितीन गडकरी आले. काम करणारा माणूस, संघाचा व भाजपचा माणूस निष्ठावंत. असं असूनही त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. आता लोकं म्हणतील की महाराष्ट्राची यादी जाहीर झालेली नाही. पण मुंबईत राहणाऱ्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या कृपाशंकर सिंह यांचं नाव यादीत आहे आणि निष्ठावंत नितीन गडकरी यांचं नाव नाही. यांचीच एक जाहीरात होती की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तसंच झालंय आता. कुठे नेऊन ठेवलाय देश माझा. जय जय महाराष्ट्र माझा हे अभिमान वाटावं असं गीत आहे. त्यात म्हटलंय की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जर माझ्या महाराष्ट्राने 42 खासदार निवडून आणून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पुढे जाऊ शकला नसतात. आता म्हणतायत की अब की बार चारसो पार. पण मी देखील बघतेच की अबकी बार भाजप चारसो पार कसे जातात ते. अबकी बार भाजप तडीपार, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

”आमचं हिंदुत्व व भाजपच्या हिंदुत्वात बराच फरक आहे. त्यांचं हिंदुत्व मी मानत नाही. आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे. त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे. आमचं हिंदुत्व हे गाडगे बाबांच हिंदुत्व आहे. ज्याला पाणी हवं त्याला पाणी देणं, अन्न हवं त्याला अन्न देणं. माझी आई आणि बाळासाहेब सांगायचे, पूर्वी गाडगेबाबा आमच्या दादरच्या घरी यायचे पण घरात नाही यायचे. घऱाबाहेरच थांबायचे. गाडगेबाबा आईला हाक मारायचे काही खायला असेल तर दे. त्यावेळी आई स्वयंपाक करायला लागली की ते सांगायचे की शिजवू नको आता काही. मला तुझ्याकडचं कालचं उरलेलं काही शिळं दे. हेच गाडेगाबाब पंढरपूरला गेले की खराटा घेऊन चंद्रभागेजवळ साफ करत बसायचे. त्यांना कुणी विचारले की तुम्ही देवाचं दर्शन घेतलं की नाही. त्यावेळी ते सांगायचे की समोर जे वारकरी आहेत ते माझा देव आहेत. इथे कचरा साठला तर रोगराई आली आणि काही अनर्थ घडला तर तुझा आतला देव मला कधी माफ करणार नाही. यांची सेवा कर मग आतला देव देखीलतुला पावेल. हेच आमचं हिंदुत्व आहे”‘, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी म्हणताता 75 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं. आपण हिशोब काढूया. आता जो काही आकडा निवडणूक आयोगाकडून आलेला आहे त्यात भाजपकडे 8000 कोटींची ठेव आहे आणि काँग्रेसकडे 800 कोटी आहेत. जे काँग्रेसला जमलं नाही ते यांनी करून दाखवलं. दहा वर्षात 8000 कोटी कमवले. तरी काँग्रेसवर आरोप करतात की यांनी देशाला लुटलं. खरंतर कुणी देशाला लुटलं ते दिसत आहे. या पैशाचा वापर गैरवापर प्रचंड मोठ मोठ्या जाहीराती देण्यात होत आहे. जाहीरातीत प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळालं हे दाखवणारी एक महिला दाखवतात. एका वृत्तपत्रात फूल पेज जाहीरात होती ती. त्या महिलेला घर मिळाले असल्याचा दावा केला होता. सोबतच 24 लाख कुटुंबियांना घर दिलं असंही म्हटलं होतं. त्यानंतर एक महिला पत्रकार त्या महिलेला शोधत तिच्या घरी गेली. तिला सांगितलं की पेपरमध्ये तुमचा फोटो आलाय. हे घर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालं आहे का. तर ती म्हणाली नाही. इथे भाड्याने राहते. कुठेतरी त्या कामाला गेलेल्या तिथे हा फोटो काढला होता. असा हा यांचा फसवे पणा”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”जिथेजिथे जातोय तिथे यांच्याविरोधात असंतोष आहे. शेतकरी कामगार विद्यार्थी आक्रोश करतायत. पण सगळ्यांच्या मनात एकच भीती आहे की ईव्हीएमचं काय. काय वाटेल ते केलं तरी ते जिंकतील असा संभ्रम निर्माण केला जातोय. सरकारविरोधात असंतोष दिसतोय. रोष दिसतोय. ईव्हीएमध्ये घोटाळा करून भाजप जिंकली तर देशात असंतोषाचा भडका उडेल. ईव्हीएम घोटाळा करून बघाच तुम्ही.”, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

आम्ही मोदीविरुद्ध एकत्र आलेलो नाही. आम्ही हुकुमशाही विरोधात एकत्र येत आहोत. आम्हाला हुकुमशहा नकोय. आमच्या डोळ्यासमोर भाजपची हुकुमशाही वृत्ती आहे. आम्ही देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत. या निवडणूकीपुरतं तुमचं जात पात बाजूला ठेवा व या हुकुमशाहीविरुद्ध एकत्र या. देश टिकला तर आपण टिकू. त्यानंतर धऱ्म कसा टिकवायचा ते बघू. देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. माझे आजोबा सांगायचे की देश डोळ्यासमोर ठेवायला हवा. आशिर्वाद द्यायला देव पाठिशी हवा. देशसेवा हे आपल्या नजरेसमोर हवा. आज हे लोकं देव डोळ्यासमोर ठेवातयात व देश कुठे ठेवलायत ते माहित नाही. मणिपूरमध्ये गेले नाहीत पण लक्षद्विपमध्ये समुद्राच्या तळाला गेले. मणिपरूरमध्य़े जाऊ शकत नाही. हे रामराज्य नाही. आम्ही राम सीता लक्ष्मण हनुमानचे भक्त आहोत. रामाची भक्ती कशी करायची हे भाजपने सांगायची गरज नाही. जनता त्यांना घरी बसवेल तेव्हा यांनी रामायण वाचावं. का रामाची भक्ती आज सुद्धा केली जाते हे वाचावं. छत्रपती शिवाजी माहाराजांचा गनिमी कावा हा एक प्रकार होता. समोर शत्रू फार मातब्बर होता. आज जसा भाजप आहेतसा. पैशाने मजबूत, शासकीय यंत्रणा त्यांच्या दाराशी झाडू काढतायत. आमच्याकडे काय आहे. शिवाजी महाराजांनी गनिमी कावाचा अवलंब केलेला पण एक सुद्धा उदारहण असं नाही की महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिलाय. तुम्ही मोठ मोठी नाव घेता पण त्यांच्यातला एक कण तरी तुमंच्यात आलाय का हा पहिला विचार करा. भारतातमध्ये हुकुमशहा जन्माला येताच क्षणी कसा गाडला जातो ते दाखवायची जबाबादारी आपल्यावर आलेली आहे. महाराष्ट्र देखील देशाला दिशा दाखवतो. पहिलं हुकुशाहीचं थडगं छत्रपतींचा महाराष्ट्र बांधून दाखवणार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.