मोदींच्या लाचारीसाठी शिवरायांचा अपमान का करता! जिरेटोप घातला ते डोकं आधी तपासा!! उद्धव ठाकरे यांचे जबरदस्त तडाखे

>> राजेश पोवळे / मनीष म्हात्रे

छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची जाज्वल्य दैवतं. शिवरायांचा जिरेटोप ही त्यांची ओळख आणि महाराष्ट्राची अस्मिता. पण देशद्रोही इक्बाल मिर्चीशी व्यवहार करणाऱया प्रफुल्ल पटेलांनी शिवरायांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर घातला. किती लाचारी करणार? तुम्ही त्यांना टोप्या घाला, आणखी काहीही घाला, पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावर ठेवला ते डोकं कसं आहे हेही तपासा. मोदींची लाचारी करताना, त्यांच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची शान का घालवता?, अपमान का करता? असा जळजळीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शिवबा आणि शंभुराजेंचे नाव घेण्याचाही आता तुम्हाला अधिकार नाही असे ठणकावतानाच, उठा… एकही मत नासवू नका. गद्दारांचे, लाचारांचे आणि हुकूमशहांचे डिपॉझिट जप्त करून विजयाची मशाल पेटवा असे जबरदस्त आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले, तेव्हा वसईतील वायएमसीए मैदान जयघोषाने दुमदुमले.

शिवसेना-महाविकास आघाडी-इंडिया गठबंधनच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा आज नवघर माणिकपूर येथील वायएमसीए मैदानावर झाली. मैदान तुडुंब गर्दीने भरून गेले होते. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मैदानाबाहेरही मोठे स्क्रीन लावल्याने चारही बाजूंचे रस्ते गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहताच ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘इंडिया आघाडीचा विजय असो’च्या गगनभेदी घोषणांनी सारे आसमंत दणाणून गेले. या गर्दीच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांची हुकूमशाही आणि त्यांची लाचारी करणाऱ्या गद्दारांची सालटी काढली.

छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसैनिक आणि वसईकरांच्या वतीने अभिवादन केले. ते पुढे म्हणाले, स्वराज्य कसे निर्माण करायचे हे महाराष्ट्राने शिवरायांच्या रूपाने… आणि ते कसे राखायचे हे शंभुराजांच्या रूपाने पाहिले. संभाजी महाराजांवर औरंगजेबाने प्रचंड दबाव आणि दडपण आणले होते. जसे आता पक्षांतर केले नाही तर जेलमध्ये टाकतो असा दबाव आणला जातो तसाच… संभाजी महाराजांसमोर जीवनमरणाचा प्रश्न होता. तरीही अत्याचाराला न डगमगता महाराज औरंगजेबासमोर झुकले नाहीत. त्यामुळे आताच्या नेभळटांना छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

ते प्रफुल्ल पटेल कशासाठी प्रसिद्ध असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच गर्दीतून इक्बाल मिर्ची… इक्बाल मिर्ची… असा आवाज घुमला. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, त्या दाऊदच्या हस्तकाशी कनेक्शन असलेल्या पटेलांना विमान खरेदी घोटाळ्यात क्लीन चिट देऊन टाकली. मोदीच म्हणाले होते, कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते है और कुछ लोग मिर्चीसे व्यवहार करते है. त्या मिर्चीसे व्यवहार करणाऱया प्रफुल्ल पटेलांना मोदी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला घेऊन गेले तेव्हा मोदींच्या डोक्यावर छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालणाऱ्या पटेलांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, जिरेटोप ही छत्रपती शिवरायांची ओळख. जशी पुणेरी पगडी, महात्मा जोतिबा फुले यांचे मुंडासं, बिरसा मुंडांचा पेहराव तसे छत्रपती शिवरायांचा जिरेटोप. शिवरायांचा हाच जिरेटोप तुम्ही मोदींच्या डोक्यावर घालताय. लाचारी करावी तरी किती? तुम्ही त्यांना टोप्या घाला, दुसरे काहीही घाला, पण महाराजांचा जिरेटोप ज्यांच्या डोक्यावर ठेवताय ते डोपं कसं आहे ते आधी तपासा, असे तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले. ते पुढे म्हणाले, हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. तुम्ही लाचार झाला तो तुमचा प्रश्न आहे. तुमची लाचारी तुमच्यापाशी; पण मोदींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची शान घालवताय हे याद राखा. या मोदींनी महाराष्ट्रासाठी असं केलंय तरी काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

यावेळी शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते विजय कदम, संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, विकास मोरे, राजेंद्र पाटील, बबनराव थोरात, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, प्रवीण म्हाप्रळकर, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, तालुकाप्रमुख राजाराम बाबर, वसई विधानसभा संघटक विनायक निकम, जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर, ग्रामीण तालुकाप्रमुख हरिश्चंद्र पाटील, विरार तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर, उपतालुकाप्रमुख मनीष वैद्य, शहरप्रमुख संजय गुरव, गणेश भायदे, उदय जाधव, प्रथमेश राऊत, प्रदीप सावंत, शिव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे, उपशहरप्रमुख शशीभुषण शर्मा, राहुल फडतरे, विभागप्रमुख शरद सावंत, उपविभागप्रमुख राजेश गोळे, शहर संघटक जसींता फिंच, शहर संघटक संगीता भोईर, वसई शहर समन्वयक नीलेश भानुशे, काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन, विजय पाटील, ओनिल अल्मेडा, धनंजय चव्हाण, मनवेल तुस्कानो, राष्ट्रवादीचे मनोज म्हात्रे, नम्रता वैती, डॉमनिका डाबरे, नोएल डाबरे, जितेंद्र सत्पाळकर, बिना फुटर्य़ाडो, मॅकेन्जी डाबरे, नितीन म्हात्रे, उत्तर भारतीयांचे नेते राधेश्याम पाठक यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भाडोत्री उमेदवार ही तर भाजपवाल्यांची ओळख

पालघरमधल्या मच्छीमारांची भेट घेऊन मी चर्चा केल्यानंतर त्यांना डिझेल परताव्याचे पैसे मिळणार नाही असे सांगत धमक्या दिल्या जात आहेत. याचाच अर्थ भाजपला पराभव डोळय़ासमोर दिसत आहे. वसईत गुंडागर्दी करणाऱयांनीही एक उमेदवार दिला आहे. एक स्वतःचा उमेदवार उभा करायचा आणि एक भाडोत्री उमेदवार द्यायचा आणि मते पह्डायची ही भाजपची पद्धत आहे, पण एकही मत नासवू नका आणि हुकूमशहा मोदी-शहा, गद्दार आणि लाचारांचे डिपॉझिट जप्त करून विजयाची मशाल पेटवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कsले. वसईतील 29 गावांचा प्रश्न गावकऱ्यांच्या इच्छेनुसार सोडवण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. वसई, विरारमधून मुंबईला जाण्यासाठी अपुऱया ट्रेन आहेत. पण पेंद्रात सरकार आले तर या सगळय़ा अडचणी सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रधानसेवक असाल तर ट्रेनने फिरा

मोदींच्या दौऱयात विमानांची उड्डाणे ठप्प केली जातात. रस्त्यावरचे ट्रफिक अडवून ठेवले जाते. जनतेच्या सोयीसुविधा वापरून तुम्ही पक्षाचा प्रचार करताय. पंतप्रधान सगळय़ांचे असतात. मग तुम्ही आमच्याही उमेदवाराचा प्रचार करायला या, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले. तुम्ही प्रधानसेवक असाल तर ट्रेनने प्रवास करा. सोयी पंतप्रधानांच्या वापरायच्या आणि ढोंग प्रधानसेवकाचे करायचे हे चालणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

वसई ते मुंबई उद्धव ठाकरे यांचा लोकल प्रवास; प्रवाशांनी केले उत्स्फूर्त स्वागत

सभा संपल्यानंतर रात्री उद्धव ठाकरे यांनी वसई ते मुंबई असा लोकलने प्रवास केला. वसई रोड रेल्वे स्थानकावर उद्धव ठाकरे यांचे प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..च्या घोषणा घुमत होत्या. हात वर करून प्रवासी अभिवादन करत होते आणि उद्धव ठाकरे या अभिवादनाचा नमस्कार करून स्वीकार करत होते. यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्या सोबत होते.

शिवसेना, महाविकास आघाडी, इंडिया गठबंधनच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा माणिकपूर येथील वायएमसीए मैदानावर झाली. यावेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

गंगेचा अपमान केलात, नकली प्रेम का दाखवता?

आज अर्ज भरताना मोदींना गहिवरून आलं असं म्हणतात. 2014 मे गंगा माँने मुझे बुलाया था. अब मुझे लगता है, गंगा माँने मुझे गोद लिया है, असे मोदी म्हणाले. मोदीजी, बहुत अच्छी बात है. जिस गंगा माँने आपको बुलाया था उसी गंगा माँ मे करोना के काल मे लाशे बहे रही थी तब माँ गंगा के आँसू आपको दिखाई नही दिये? वो मेरी गंगा माँ आक्रोश कर रही थी, ये क्या हो रहा है? मृतदेह सोडण्यासाठी तुम्हाला गंगा माँने बोलावले होते काय, असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मोदीजी, तुम्ंही विसरलात, पण हा देश विसरणार नाही हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत ठाकरी समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

तुमची पालखी वाहायला मी अंधभक्त नाही

दोन दिवसांपूर्वी येथे भाकड जनता पार्टीचे बेअकली नेते येऊन गेले. त्यांना बेअकली म्हणतो, कारण मी आधीच सांगितले आहे की, जे शिवसेनेला नकली म्हणतील ते बेअकली आणि ते शिवसेनेला नकली म्हणाले म्हणजे ते नक्कीच बेअकलीच आहेत. ते बेअकली नेते मला म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मी म्हणतो, अमित शहा, तुम्ही सांगाल तो मुहूर्त मानायला आणि तुमची पालखी वाहायला मी अंधभक्त नाही. तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर समोरासमोर व्यासपीठावर या. म्हणाल तिथे मी चर्चा करायला तयार आहे. वाट्टेल ते प्रश्न विचारा, मी उत्तर देतो; पण मी जे प्रश्न विचारीन त्याच्यावर तुम्ही बोलून दाखवाच.