शिवसेना सांभाळायला हवी होती, तेव्हा या गद्दारांनी शिवसेना विकली; उद्धव ठाकरे कडाडले

”जेव्हा यांना दाढीसुद्धा फुटली नव्हती. तेव्हा मी माँसाहेबांसोबत या ठाण्यात बैलगाडीतून फिरलो आहे. मला एका गोष्टीचं दु:ख वाटतं. यांना काय दिलं नव्हतं. जे देता आलं ते दिलं. मला एकतरी मुख्यमंत्री दाखवा ज्याने नगरविकास खातं कुणा दुसऱ्याला दिलंय. मी यांना दिलं होतं. पण यांची एवढी भूक वाढली. भस्म्या झाला होता यांना. माझं ऑपरेशन झालेलं असताना शिवसेना सांभाळायला हवी होती तेव्हा या गद्दारांनी शिवसेना विकली”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ठाणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांचे पिसे काढली.

आनंद दिघेंची तुलना कुणी करू नये. त्यांचं एक वेगळंच रुप होतं, त्यांचं काम वेगळं होतं. फोटोपुरतं दिघे साहेब, हिंदुहृदयसम्राट करून चालत नाही. आज बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागवी लागत आहेत यांना. हे मिंधे आणि ते उपमुख्यमंत्री बोलत होते की याआधी मोदींचे फोटो लावून मतं मागितली. मग आता का यांना हिंदुहृदयसम्राट यांचा फोटो लावून मतं मागावी लागत आहेत. मला अक्षय कुमारला सांगायचे आहे की चार तारखेच्या आत मोदीजींचा इंटरव्ह्यू घ्या व त्यावेळी जसं आंबा कसा खायचा ते विचारलं होतं तसं आता टरबूज कसा खायचा ते विचारा. 4 तारखेच्या आत मुलाखत घ्या नाहीतर त्यानंतर टरबूजाचा भाव उतरणार आहे. आता तर भाव नाहीच आहे त्यांना. आज तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही उद्या ही जनता तुम्हाला भाव देणार नाही. जेव्हा युद्ध होतं तेव्हा मनगट घट्ट करायला पाहिजे. मनगटात तलवार येण्याआधी मन घट्ट पाहिजे. माझं मन घट्ट आहे म्हणून मी यांना गाडायला उभा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी मिंध्याना सुनावले.

”हे ठाणं माझ्या शिवसेनेचं आहे. पहिलं विजयाचं माप शिवसेनेच्या पदरात घातलं होतं ते या ठाणेकरांनी. त्या साठी मी ठाणेकरांचा ऋणी आहे. बाळासाहेबांनी देखील सांष्टांग दंडवत घातला होता. मला आठतंय. 2012 च्या महापालिका निवडणूका फेब्रुवारीत झाल्या. त्यावेळी बाळासाहेबांचीा तब्येत ठणठणीत नव्हती. तरीदेखील ते मला म्हणाले की मला दोन सभा घ्यायच्याच आहेत. एक शिवतीर्थ आणि दुसरी माझ्या ठाण्यात. हे इतक्या वर्षांचं ठाण्याशी नातं आहे आमचं. पहिले नगराध्यक्ष ठाण्यातून बनला. ठाणे आज शहर झालंय. पण मी माझ्या माँ सोबत बैलगाडीतून इथे फिरलोय. तेव्हा यांना दाढी सुद्धा फुटली नसेल. अक्कल दाढ देखील आली नव्हती. आता देखील अक्कल नाहीए. मला दु:ख या गोष्टीचं आहे की मी त्यांना काय दिलं नव्हतं. सगळं जे देता येणं त्यांना दिलं होतं. जे देता आलं ते दिलं. मला एकतरी मुख्यमंत्री दाखवा ज्याने नगरविकास खातं कुणा दुसऱ्याला दिलंय. मी यांना दिलं होतं. पण यांची एवढी भूक वाढली. भस्म्या झाला होता यांना. माझं ऑपरेशन झालेलं असताना शिवसेना सांभाळायला हवी होती तेव्हा या गद्दारांनी शिवसेना विकली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”आज भाजपची जी हालत झाली आहे. मला भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे की आज जी भाजपची हालत आहे ती तुम्हाला मान्य आहे का? आज मला त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारायचं आहे की याच साठी केला होता का अट्टाहास. निष्ठावंत भाजप कुठे आहे ? मोदीजी तुम्ही नकली सेना म्हणता पण तुमचा भाजपा नकली झाला आहे. सर्व आयात घेताय. तुम्हाला राजकाराणात पोरं होतं नाही मग त्याला आम्ही काय करणार. आमचा काय दोष आहे. तुमच्याकडे उमेदवार नाही म्हणून गद्दार उमेदवार दिला. द्यायचा होता भाजपचा कार्यकर्ता. भाजपचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला असता तर लढायला देखील मजा आली असती. का भाजपकडे कार्यकर्ते नाहीत. संघाच्या लोकांनी भाजपच्या लोकांनी पक्ष वाढविण्यासाठी एवढ्या खस्त्या खाल्ल्या. मेहनत केली आणि भाजपचं नेतृत्व आज त्यांना गद्दरांच्या सतंरंज्या उचलायला लावतंय़य. यात आयुष्य वाया घालवताय. त्यांना मी आावाहन करतोय. अस्सल भाजपवाले संघावाले आहेत. या माझ्यासोबत. या नेऊ आपण हिंदुत्व पुढे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. तर आमचं हिंदुत्व घऱातली चूल पेटवणारं आहे. हा मोठा फरक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”घराणेशाहीचं झालं की त्यानंतर मोदींचं हिंदु मुस्लीम सुरू झालं होतं. कालपर्यंत तुम्ही मुसलमानांना शिव्या घालत होतात. अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की मी लहान असताना मुस्लीम कुटुंबासोबत वाढलो आहे. ताजियाच्या मिरवणूकीत खालून गेलेलो आहे. ईदला मुस्लीम कुटुंबांकडून जेवण यांयचं. मोदीजी ते जे जेवण यायचं त्यात तुम्ही ज्यावर बंदी घातली आहे ते पण होतं का? ते तुम्ही खाल्ल आहे का?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला.

”अमित शहा आज बोलले मोदींना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान करा. ते पंतप्रधान झाल्यावर त्यानंतर जो गोहत्या करेल त्याला उलटं टांगू. मग शहाजी आजपर्यंत काय करत होतात? गेली दहा वर्ष काय केलात तुम्ही? तुम्ही गोमाता माना जरूर माना. त्याआधी आमच्या मातेच्या रक्षणाचं काय ते सांगा. सावरकर हवे ना तुम्हाला मोदीजी मग सावकरांचे गाईबद्दलचे विचार काय होते ते वाचून बघा. सावरकरांनी गाईबद्दल जे लिहले ते विचार तुम्हाला मान्य़ आहे का ते सांगाच. तुम्ही गाईवर का बोलता महागाईवर का नाही बोलत. 25 सभा महाराष्ट्रात घेतल्या. पण त्यात महागाईचा म तरी बोलले का? मुसलामानांची भीती दाखवतात. भाजपचं असं झालंय की एखादं मूल रडायला लागलं तर त्याला भूक लागलेली असते म्हणून रडतंय त्याला अन्न नाही द्यायचं. त्याला भूताची भीती दाखवून झोपवायचं. कोणता हा देश आहे?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

”काल मुंबईत जो रोड शो झाला. त्याच्या दोन दिवस आधी त्याच ठिकाणी एक दुर्घटना झाली. त्याच भागात मोदीजी तुम्ही कसला तमाशा केला. तुमच्या अहंकाराचा शो केला. एवढी निर्दयता आली कुठून? अचानक मेट्रो रस्ते बंद करून टाकली. अनेक महिला चिडल्या. अनेक महिला घरी निघाल्या त्या म्हणाल्या यांना बघून करू काय टीव्हीवर दिसतात ना. भारत माता की जय म्हणता अहो हीच तर देशाची भारतमाता आहे. याची तुम्ही कदर करत नाही. भारतमाता म्हणजे देशातली माणसं आहे. देशातले दगडधोंडे नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.