लाडक्या बहिणींमध्ये बापे कोणी घुसवले? हा पैसा गेला कोणाकडे? उद्धव ठाकरे यांचा हल्ला

महाराष्ट्रात पाशवी बहुमतावर हे सरकार आले, पण या सरकारचा बुरखा फाटला आहे. शेतकरी कर्जमुक्ती केली नाही, लाडक्या बहिणींची फसवणूक केली, आता तर लाडक्या बहिणींमध्ये बापे घुसले आहेत. हे कोणी घुसवले, पैसे कुठे गेले, असा सणसणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. राज्यातल्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लवकरच राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

बुलढाण्यातील शेतकरी क्रांती संघटना आज शिवसेनेत विलीन झाली. यावेळी या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्या राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

त्यानंतर शेतकरी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना या सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांना दिलेली फसवी आश्वासने, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांना सरकारने फासलेला हरताळ, शिवसेनेशी केलेली गद्दारी या सर्वांचा समाचार घेतला.

ते म्हणाले की, हे लोक शिवसेना आणि उद्धव ठाकरे संपवायला निघाले आहेत आणि तरीसुद्धा त्यांना एक प्रश्न पडला आहे की, येवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत का नाही? पण त्यांना कळत नाही की सगळीच माणसं पैशाने विकली जात नाहीत. गद्दार पैशाने विकले जात असतील, पण निष्ठावान विकले जाऊ शकत नाहीत, म्हणून माझ्यासोबत सगळे जुने सहकारी शिवसैनिक आहेत. अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचे हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. काही जणांना आपण मोठे केले ते लोक गेले, पण ज्यांनी त्यांना मोठे केले ती माणसे आज माझ्यासोबत आहेत याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, आमदार संजय दरेकर, शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही नेमके कशासाठी शिवसेनेत येत आहात? तुमच्या संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व होतं, पण तुम्ही माझ्याकडे किंवा शिवसेनेकडे असे काय पाहिले? आता संपूर्ण संघटना शिवसेनेत विलीन करीत आहात. मला वाटते आयुष्यात बाकी सर्व गोष्टी असतात, पण प्रामाणिकपणा विकत घेतला जाऊ शकत नाही. प्रामाणिकपणे आणि अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. माझ्या आयुष्यात मुख्यमंत्री म्हणून नागपूरचे एकच अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात कोणत्याही शेतकऱ्याने आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली नव्हती, पण मला असं वाटलं की मला ही संधी मिळाली आहे म्हणून शेतकऱ्यांना नुसते झुलवत ठेवण्यापेक्षा जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याचं आपण काही तरी देणं लागतो. मी त्यांच्या आयुष्यात पूर्ण सुख, समाधान आणू शकत नाही तेवढं मी केलं पाहिजे म्हणून त्या एका माझ्या भावनेला जागून शेतकऱ्यांना तेव्हा कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला.

कर्जमुक्तीसाठी आंदोलन

मधल्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अकोला, अमरावती  बुलढाणा येथे ट्रक्टर मोर्चा काढला होता. ते आंदोलन सुरू ठेवले पाहिजे असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

मध्यस्थी करून कैवारी दाखवण्याचा प्रयत्न

सरकारच्या सध्याच्या कार्यपद्धतीचे वर्णन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एखाद्या गोष्टीत थेट त्रास द्यायचा, मग मध्यस्थी करून मी कसा तुमचा पैवारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आयुष्य समाधानाने चालले आहे त्यामध्ये कोणता तरी त्रास द्यायचा त्रास दिला की तुम्ही त्यांच्याकडे जाणार, मग ते सर्व मिटवून टाकायचे या सर्व गोष्टींचा त्यांचा बुरखा फाटला आहे तो लोकांसमोर आणण्याची गरज आहे.

 जनतेशी प्रामाणिक रहा

शिवसेनेने विलीन झाल्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामगिरी मागितली त्याचा संदर्भ देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेशी प्रामाणिक राहणे हीच जबाबदारी आहे, पण जनतेला कोणी वाली राहिलेला नाही. जनता आता बघत आहे की पाशवी बहुमताचे सरकार आहे, पण आयुष्याचे भोग काही संपत नाहीत. त्यामुळे जनतेला मदत करा. त्यांना दिलासा द्या,  सत्ताधारी काहीही करतो आम्ही तुमच्यासोबत आहोत असे माताभगिनींना सांगा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आता रमीला ऑलिम्पिकमध्ये स्थान

माणिकराव कोकोटे यांना क्रीडा मंत्री पद दिले आहे त्यावर टीका करताना ते म्हणाले की, आता तर कार्टून आले आहे की रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये स्थान देणार. रमी खेळणारा माणूस क्रीडामंत्री झाला हे असे सर्व सरकार चालले आहे. ही भ्रष्टाचाराची याची सर्व उघडे झालेले विद्रूप चेहरे आहेत तेसुद्धा आपल्याला लोकांसमोर न्यावे लागतील. त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

इतका हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही

वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी जोर लावला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मंत्र्यांचे राजीनामे घेण्याच्या ऐवजी त्यांना समज दिली. धुळय़ाच्या रेस्टहाऊसमध्ये पकडलेली रोकड, त्यांची चौकशी थंडावली, बॅगा घेऊन बसलेल्यांची चौकशी नाही. एवढे हतबल मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिले नव्हते. कोणी कोणाला जाबच विचारू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची नीतिमूल्ये कुठे गेली?

विरोधी पक्षाच्या कामगिरीचे वर्णन करताना ते म्हणाले की, विधिमंडळाच्या अधिवेशनात मागील विरोधी पक्ष वरचढ ठरला, आतासुद्धा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सळो की पळो करून सोडले. कारण मुद्देच तसे होते. महाराष्ट्रात आपण पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणे दिली. देवेंद्र फडणवीस यांनी नीतिमूल्ये समिती स्थापन केली होती. आता ती नीतिमूल्ये गेली कुठे, असा सवाल त्यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत जे घडले ते अनाकलनीय आहे, पण मला खात्री आहे की, आपल्या महाराष्ट्रातील जनता एवढी काही उफराटी नाही, पण काही तरी गडबड घोटाळा झालेला आहे. निवडणुकीपूर्वी असे मोठे स्वप्न दाखवायचे की, क्षणभर काही टक्के लोक त्याला भुलले असतील, पण आता  निवडणूक झाल्यावर त्यांचे खरे स्वरूप बाहेर पडलेले दिसत आहे.