
मराठवाडय़ातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयाला नुकसानभरपाईचे हजारो कोटींचे गाजर दाखवून महायुती सरकारने त्यांची फसवणूक केली. त्या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. बरोबरच सरकारच्या फसव्या योजनांचाही पर्दाफाश करून दगाबाज सरकारचे खरे रूप समोर आणणार आहेत.
सरकारी फसवणुकीचा बुरखा टराटरा फाडणारा उद्धव ठाकरे यांचा हा दौरा ‘दगाबाज रे’ या शीर्षकाखाली होणार आहे. सरकारकडून आतापर्यंत किती नुकसानभरपाई शेतकऱयांच्या खात्यात जमा झाली याची माहिती ते घेणार आहेत, असे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीसांगितले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाडय़ातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. अतिवृष्टीग्रस्त गावांमधील शेतकऱयांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतानाच आतापर्यंत त्यांना किती आणि कोणत्या स्वरूपाची मदत मिळाली, याची माहिती उद्धव ठाकरे घेणार आहेत. कारण दिवाळी सरून दहा दिवस उलटले, तुळशीची लग्ने झाली तरी शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसला आहे ही वस्तुस्थिती वारंवार समोर येऊ लागली आहे.
उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा तेथील जिह्यांतील शेतकऱयांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. मायबाप सरकारने दुर्लक्ष केलेला शेतकरी न्यायाची आस लावून बसला आहे. सरकारकडून त्याच्या खात्यावर नुकसानभरपाई म्हणून पाच रुपये, दहा रुपये जमा करून त्याची थट्टा केली जात आहे. अन्नदाता बळीराजा त्याबद्दल सरकारवर नाराज आणि संतप्त आहे. उद्धव ठाकरे या दौऱयात शेतकऱयांशी संवाद साधतानाच सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱयांनाही मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यावेळी शेतकरी बांधव आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावागावांत जाऊन चावडी, पारावर बसून संवाद
उद्धव ठाकरे या दौऱयात मराठवाडय़ातील गावागावांत जाऊन तेथील चावडी आणि पारावर शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. शिवसेनेच्या वतीने शक्य होईल तितकी मदत बाधित शेतकऱयांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांकडून शेतकऱयांना जीवनावश्यक वस्तू पाठवल्या गेल्या. अजूनही शिवसैनिकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. आणखी कोणत्या स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना लागणार आहे त्याची माहितीही शिवसैनिकांनी घ्यावी आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी, अशा सूचनाही त्यांनी पदाधिकाऱयांना दिल्या आहेत.
असा असेल दौरा
आज
छत्रपती संभाजीनगरमधील नांदर, बीडमधील पाली, धाराशीवमधील पाथ्रुड, शिरसाव, सोलापूरमधील बार्शीतील शेतकऱ्यांशी संवाद.
गुरुवार, 6 नोव्हेंबर
धाराशीवच्या करंजखेडा, लातूरच्या भुसणी, थोरलेवाडी, नांदेडच्या पार्डीतील शेतकऱ्यांशी संवाद.
शुक्रवार, 7 नोव्हेंबर
नांदेडच्या अर्धापुरातील पार्डी, हिंगोलीतील वारंगा, जवळाबाजार, परभणीतील पिंगळी स्टेशन येथील शेतकऱयांशी संवाद.
शनिवार, 8 नोव्हेंबर
परभणीतील ताडबोरगाव, ढेंगळी पिंपळगाव, जालन्यातील पाटोदा, लिंबोणीत शेतकऱ्यांशी संवाद.





























































