
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनात जमलेल्या जिल्हाप्रमुखांशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शिवसेना भवनात उपस्थित होते. जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिले आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना ठणकावलं. तसंच, शिवसैनिकांना आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ओढवलेल्या स्थितीविषयी देखील सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की, मला सत्तेचा मोह नाही आणि माझ्याविषयी कोण काय बोलतं यात मला अजिबात पडायचं नाही. पण, जे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेशी निष्ठा राखण्याबाबत बोलत होते, ते त्या श्वासाआधीच शिवसेना सोडून गेले आहेत. बंडखोर आमदारांनी शिवसेनेत फूट पाडण्याचं काम केलं आहे. जे लोक आधी मोठमोठ्या गाड्यांमध्ये माझे फोटो लावून आपापल्या मतदारसंघात फिरत होते, त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी माझा फोटो न लावता मतदारसंघात फिरून पाहावं. जे सोडून गेले आहेत, त्यांच्याविषयी मला अजिबात वाईट वाटत नाही आणि वाईट वाटण्याचं कारण तरी काय? मी अद्याप जिद्द सोडलेली नाही, मी माझ्या जिद्दीवर ठाम आहे, असं शिवसेना पक्षप्रमुखांनी बंडखोर आमदारांना ठणकावून सांगितलं.
ते पुढ म्हणाले की, तुम्ही झाडाच्या फांद्या तोडू शकता, फुलं तोडू शकता पण झाडाला तिथून हलवू शकत नाही. शिवसेनेच्या अस्तित्वाविषयी शंका घेणाऱ्यांनी आपली निष्ठा किती आहे ती तपासून पहावी. मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय नाही केलं. त्यांना नगर विकास मंत्रालयासारखं एक चांगलं मंत्रीपद दिलं. जर त्यानंतरही ही वागणूक मिळणार असेल, तर ते त्यांचे विचार आहेत, असं मला वाटतं. या आमदारांना आमिष देऊन आपल्या बाजूने वळवण्यात आलं आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.





















































