
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत आणि आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी शिवायल कार्यालयात ससून डॉकमधील कोळी बांधवांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ”कोळी बांधवांना हुसकावण्याची भाषा करत असाल तर शिवसेना तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दात महायुती सरकारला सुनावले आहे.
ससून डॉकमधील मासळी उद्योग संकटात सापडला आहे. डॉकमधील गोडाऊनमध्ये पिढ्यान्पिढ्या व्यवसाय करणारे मासळी व्यावसायिक अनेक वर्षे महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाला (एमएफडीसी) भाडे देत आहेत. मात्र ते भाडे आपल्याला मिळालेच नाही, असा दावा करून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने मासळी व्यावसायिकांना बाहेर काढण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्याबाबत आज ससून डॉकमधील कोळी बांधवांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
”आता शिवसेना तुमच्या सोबत आली आहे. तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय. काही दिवसांनी बघू तर ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब. असं होऊ देऊ नका. एकत्र रहा एकजुटीने रहा. शिवसेनाप्रमुख बोललेले की अन्यायावरती तुटून पडा, पण मी म्हणेन की अन्याय करणाऱ्याला अन्यायासकट तोडून टाका’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”कोरोनाचा काळ जागतिक संकटाचा होता. आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही. जर आमचं सरकार आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आलीच नसती. बोललो की केलंच पाहिजे. आपलं सरकार आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आलीच नसती. शिवसेनेची स्थापनाच भूमीपुत्रांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी झाली आहे. महाराष्ट्राचा भूमीपुत्र मराठी आहे. आपण आपल्या पंरपरागत चाललेल्या गोष्टी करत इथे राहत आलेलो आहोत. पण हल्ली या परंपरागत गोष्टी नाहिशा होत चालल्या आहेत. तोच एक मुद्दा घेऊन सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघाले आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”समर्थ रामदास म्हणालेले की मराठा तेतुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. तसं भाजपवाले बोलत आहेत की भ्रष्टाचार तेतुका मेळवावा भाजप पक्ष वाढवावा. यावर गंमत सांगतो की एका वडिलाने मुलाला विचारलं की भविष्यात तुला काय करायचं आहे तुला. मुलगा बोलला की मला भाजपात जायचं आहे आणि देशासाठी काहीतरी करायचं आहे. त्यावर वडिल बोलले की असं डायरेक्ट भाजपमध्ये नको जाऊ. आधी वेगळ्या पक्षात जा. काहीतरी मोठा घोटाळा कर मग भाजपवाले तुला सन्मानाने त्यांच्या पक्षात घेतील. तु थेट भाजपात गेलास तर उपऱ्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतील”, हा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मच्छिमारांकडे कोणताही सात बाराचा उतारा नाही. मत्सशेती म्हणजे तुम्ही समुद्रात जाऊन मासेमारी करता. निसर्ग, तौक्ते वादळ आलेलं तेव्हा मी कलेक्टरकडे चौकशी करायचो तर ते सांगायचे ते ऐकून मला घाम फुटायचा. एवढे मच्छिमार समुद्रात गेलेयत. काही परत आलेले नाही. त्यांचा संपर्क होत नाही. असं सांगायचे. जीव धोक्यात घालून तुम्ही समुद्रात जाता. किती दिवस राहता, कसे राहता, जीव धोक्यात घालता असं असताना तुम्ही परत आल्यावर तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिली जातेय. तुम्हाला हुसकावण्याची भाषा करणाऱ्याला मच्छी का पाणी आणि मराठीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे. आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही मिठागरं निर्माण करणारी लोकं आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.