
मुंबईत तीन महिन्यांपूर्वी बीकेसी मैदानावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा झाली तेव्हा देशात युतीचे सरकार येणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले होते आणि युतीचे सरकारच आले. आता पुढील महिन्यात आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. आताही युतीच आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचेच सरकार येणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले.
बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केलेल्या समारंभात मेट्रोच्या विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर आले तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की प्रधानमंत्री मोदीजी, किती गोष्टींसाठी मी तुमचे आभार मानू. कारण गेली अनेक वर्षे ज्या गोष्टी आपण बोलत होतो की, देशात आपले सरकार आल्यावर आम्ही हे करू, आम्ही ते करू आणि काही वेळेला असे वाटत होते की या गोष्टी पूर्ण होतील की नाही, पण आज मला अभिमान आहे की दिलेली आश्वासने आपण पूर्ण केलीत.
हिंदुस्थानवासीयांचे स्वप्न पूर्ण केलेत
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, दोन-तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली विराट सभा झाली होती. त्या सभेत आपण ठणकावून सांगितले होते की, आमचे सरकार येणारच आणि सरकार सत्तेवर आलेच. पुढे सत्ता आल्यानंतर कश्मीरमधील 370 कलम रद्द केले. त्यावरही काही जणांनी मला प्रश्न केला की, हे तुम्हाला खरे वाटते का? त्यावर मी उत्तर दिले की, असे निर्णय घेण्याची नरेंद्र मोदींशिवाय दुसऱयाची कोणाची हिंमत नाही. मोदीजी, मला अभिमान आहे की जे स्वप्न तमाम हिंदुस्थानवासीयांनी आपल्या उराशी बाळगले होते ते प्रत्यक्षात आणले. कारण कश्मीर हा आपला अविभाज्य घटक आहे आणि राहणारच हे तुम्ही प्रत्यक्षात आणून दाखवले आहे.
अयोध्येत राममंदिर
आता या गोष्टी केल्यात आणि नजीकच्या काळात अयोध्येत राममंदिरसुद्धा उभे करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. समान नागरी कायदा देशासाठी आपण करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हे आपल्या देशाचे अभिमानाचे-अस्तित्वाचे विषय आहेत. ते विषय आपण सक्षमपणे हाताळत आहात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.
चंद्राला गवसणी घातली
चांद्रयान मोहिमेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण बालपणी चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का अशी बालगीते गात होतो. त्या चंद्राला गवसणी घातली हे केवढे मोठे काम तुम्ही केले.
देशाला दिशा देणारे नेतृत्व
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला या सर्वांचा अभिमान आहे. आपला देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. आपल्या देशाची क्षमता आहे. या देशाला दिशा देणारे समर्थ नेतृत्व पाहिजे होते. ते नेतृत्व आपल्याला मोदींच्या रूपातून सापडले आहे. देशाचा नेता आम्हाला मोदीजी तुमच्या रूपात सापडला आहे.
विकासासाठी सत्ता हवी
युतीवर बोलताना पुढे म्हणाले की, युती आहे. जे करायचे ते दिलखुलासपणे करायचे. आम्हालासद्धा सत्ता जरूर हवी आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, पण राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे. म्हणूनच हे सर्व उपक्रम मुंबईकरांच्या सेवेत समर्पित करीत आहोत. त्यामुळे मनापासून आनंद होत आहे.
मित्रपक्षांना सोबत घेऊनच
आपण मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे जात आहोत असा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे नाव घेतले आणि मित्रपक्षांचे चांगले सरकार घेऊन पुढे जात आहोत, असे रामदास आठवले यांच्याकडे बघत सांगितले.
इलेक्ट्रिक बस
एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील आगारात दोन दिवसांपूर्वी एसटीच्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन झाले त्याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हणाले की, इलेक्ट्रिक बस आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. एसटीच्या माध्यमातून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी करीत असल्याचा आवर्जून उल्लेख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
लोकसंख्येला सुविधा
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पायाभूत सुविधांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मुंबई, नागपूर, पुणे, संभाजीनगरमधील लोकसंख्या वाढत आहे. पण वाढत्या लोकसंख्येला सुविधा देण्याचे काम करीत आहात याबद्दलही तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे, असेही ते आवर्जून म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची टाळय़ा वाजवून दाद
आगामी विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सरकार घेऊन आपण पुढच्या महिन्यात निवडणुकीला सामोरे जात आहोत. राज्यात येणारच तर युतीचेच सरकार येणार असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. त्यावर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वात जास्त टाळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाजवल्या आहेत आणि मीसुद्धा नरेंद्र मोदींच्या समोरच फडणवीस यांच्याकडून युतीवर टाळ्या वाजवून घेतल्या आहेत. यावर पुन्हा एकदा दाद देत उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.


























































