भाग – 2
>> संजय राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बेधडक मुलाखतीने विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापवले आहे. मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी ‘युती’पासून मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व प्रश्नांना जोरकस उत्तरे दिली. मुलाखतीच्या दुसर्या भागात शेतकर्यांच्या प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली. पीक विमा योजनेतील ‘दलाल’ मंडळींवर हल्ला केला. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने सरकारच्या पाठीत वार केला नाही. सरकारशी संघर्ष झाला तो जनतेच्या प्रश्नांवर. अनेकदा विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरावं लागलं. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत परखडपणे सांगितले, ‘सत्तेचा गैरवापर करून सूडाचे राजकारण करणे आम्हाला मान्य नाही. आम्ही समोरासमोर लढू.’ मुलाखतीच्या दुसर्या भागात आर्थिक मंदीपासून शिवसेना-भाजपच्या नात्यापर्यंत अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली.
सरकारमध्ये बसून शिवसेनेने ज्या विषयावर वाद केले व रस्त्यांवर उतरली तो विषय म्हणजे पीक विमा योजना. सरकारमध्ये राहूनही रस्त्यावर का उतरलात, हा प्रश्न येताच उद्धव ठाकरे म्हणाले, ‘का म्हणजे? प्रधानमंत्री फसल विमा योजना चांगली आहे, पण योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे त्यात गोलमाल आहे.’
‘गोलमाल’ थांबवायला सरकार आहे ना?
– असेल, पण अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं.
नक्की काय गोलमाल झालाय?
- देशाच्या कृषीमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलं आहे की, याच्यामध्ये गडबड आहे, सुधार केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचंसुद्धा स्टेटमेंट आहे. मी त्याच्याकडे लक्ष वेधलं. हा विषय असा आहे की, ही योजना शेतकर्यांसाठी आहे. त्याच्यात जे काही माझं अल्प ज्ञान आहे आणि मला जे काही समजलंय ते आपल्यासमोर मांडतो. दोन टक्के जो काही हिस्सा असतो शेतकर्यांचा तो शेतकरी देतो आणि उरलेलं जे काही आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार देतं. म्हणजे टक्क्यांत आठ टक्के, बारा टक्के जरी असलं तरी ही एकूण शंभर टक्क्यांची विभागणी आहे. ज्या कंपन्या याच्यामध्ये ही सुविधा देताहेत, मला नाही वाटत त्यांचा एकही पैसा याच्यात गुंतवला जात असेल. शेतकर्यांकडून हप्ता घेताना या कंपन्यांचे दलाल फिरतात. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची वेळ येते, तेव्हा त्या गावात कुणी जात नाही. गावात तर सोडाच, तालुक्यात, जिह्यात या कंपन्यांची ऑफिसेससुद्धा नाहीत. ही एक मोठी त्रुटी या योजनेमध्ये आहे.
म्हणजे शेतकर्यांना भरपाई मिळत नाही…
– नुकसानभरपाईचा, पाहणीचा देखावा केला जातो त्याच्या मध्येसुद्धा कोण लोक असतात? मग माझा प्रश्न असा आहे की, जर सरकार जो पैसा विमा कंपन्यांकडे देते, तो शेतकर्यांसाठी म्हणून देते. नुकसान झालं तर भरपाई द्यायला पाहिजे. नाही झाली तर तो पैसा सरकारकडे परत आला पाहिजे. इतर वेळेला योजनेमध्ये काय होतं, जसं लाईफ इन्शुरन्स वगैरे… की तो नफा म्हणून कंपन्यांकडे वर्ग होतो आणि मग जेव्हा नुकसान होतं तेव्हा त्यातला हिस्सा हा काढून दिला जातो. जर दुष्काळामध्ये शेतकर्याचं नुकसान झालेलं तुम्हाला दिसलं नसेल तर मग नुकसान हे तुमच्या लेखी आहे तरी काय? महाराष्ट्रामध्ये सातत्याने नापिकी आणि त्याच्यामुळे शेतकर्याच्या नशिबी कर्जबाजारी आलेली आहे… या सगळ्या दुष्काळामध्ये शेतकर्याचं नुकसान झालेलं तुम्हाला दिसत नसेल तर मग सरकारने दुष्काळ जाहीर केला त्याचं काय झालं? का सरकारला सरासरी काढून नुकसानभरपाई द्यावी लागली?
पण हे सगळे विषय कॅबिनेट किंवा सरकार म्हणून आपण जेव्हा बसतो त्यात बसून सुटू शकतात…
– शकतात, पण नाही सुटले.
असं विरोधकांचं एक म्हणणं आहे…
– हो, पण मुद्दा विरोधकांच्या लक्षातच नाही आलेला… त्याच्यामुळे कोणी विरोधकांनी पीक विमा योजनेबद्दल ‘ब्र’सुद्धा काढलेला नाही आणि आता हे केंद्र सरकार, जे केंद्रीय कृषीमंत्री आहेत त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पण ते कळलेलं आहे की, यात सुधारणा केली पाहिजे.
आपण सत्तेत पाच वर्षे आहात आणि आता प्रचाराला जाताना पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा विषय हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का?
– का नाही?
अशी कोणती पाच विकास कामं आपण सांगू शकाल?
– मी सांगतो तुम्हाला… पहिला मुद्दा एकच आहे, पाच कामं सांगण्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा मी एकच सांगेन की, ज्या वेळेला शिवसेना लढते ती लोकांना दिसते. पण सरकारच्या जेव्हा जाहिराती येतात, ही कामं झाली, ती कामं झाली… ती कामे झालेली दिसतात. शिवसेनेने सरकारला कधीही दगा दिला नाही. मी सरकारसमोर प्रश्न घेऊन उभा राहिलो. याहीपुढे प्रश्न मांडायचे असतील तर मी जरूर मांडेन… पण सरकारला मी कुठे दगाफटका होऊ दिला का? सरकार पाडण्यासाठी काही कलागती केल्या का? अजिबात केल्या नाहीत, की सरकार आता पडेल… हे पाप मी नाही केलं. मी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड कधीही आलेलो नाही. मग तो समृद्धी महामार्ग असेल किंवा आता कर्जमाफीचीसुद्धा योजना असेल… या सगळ्या योजना आणि इतरसुद्धा काही रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, जलयुक्त शिवार जसं सरकारने केलं, त्याच बरोबरीने शिवजलक्रांती शिवसेनेने आपल्या जोरावर केली.
जलयुक्त शिवार योजना फसली…
– फसली याचं कारण पाऊस नाही…
अशाप्रकारचं चित्र समोर आलंय.
– जलयुक्त शिवार म्हणा किंवा धरणं म्हणा… जोपर्यंत पाऊस पडत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होऊच शकत नाही, पण पडलेला पाऊस… ते पाणी वाहून जाण्याऐवजी ते साठवण्यासाठी जर का आपण योजना केली तर… थोडक्यात असं आहे की, जे पाणी थोड्या दिवसांत उडून जातं किंवा निघून जातं, ते पाणी टिकवणं म्हणजे मी साचवणं नाही… साठवणं म्हणेन किंवा पुरवून घेणं म्हणेन… त्याच्यासाठी या योजना आहेत.
आपण विकासाच्या मुद्दय़ावर बोलताय… की हा विकासाचा मुद्दा प्रचारात येऊ शकतो. पण भारतीय जनता पक्षाची भूमिका वेगळी आहे. अमित शहा यांचं म्हणणं असं आहे… त्यांनी मुंबईत येऊन सांगितलं की, 370 कलम हा महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रचाराचा मुद्दा होईल.
– होऊही शकतो…
राज्याच्या प्रचारात 370…?
– एक मुद्दा असा आहे की, विकास कामांच्या जाहिराती तर चालू आहेत.. बरोबर आहे? जसं मी म्हणतो की, आपलं पूर्वीचं शिवशाहीचं सरकार होतं, मुंबई-पुणे रस्ता एक स्वप्न… ते स्वप्न… भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी हे तेव्हा मंत्री होते… आता समृद्धी महामार्ग… हा मुंबई ते नागपूर… हा महामार्ग करत असताना शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मंत्री आहेत… त्यांनीही जोर लावलेला आहे.
370 हा विधानसभेचा विषय आहे काय?
– 370 कलम हा जो विषय आहे, हा म्हटला तर महाराष्ट्राचा आहे, म्हटला तर नाही…पण शेवटी देशाचा आहे. ज्या वेळेला 370 कलम हटवलं गेलं त्याच क्षणी, किंबहुना त्या वेळेला जे पत्रकार माझ्याकडे आले होते, त्यांच्या प्रश्नांना किंवा प्रतिक्रियेला सामोरे जाण्याच्या आधी मी त्यांना पेढे वाटले होते. कारण ते खूप वर्षांपासूनचं आपलं स्वप्न म्हणण्यापेक्षा ती आवश्यकता होती. आपला देश पूर्ण स्वतंत्र त्या दिवशी झाला.
सत्तेत असूनसुद्धा आपण अनेकदा वेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. आपण नाणार घालवलं…
नाणार नाही घालवलं… नाणार आहे. नाणारचा प्रकल्प घालवला…
नाणार प्रकल्प आपण घालवला… भारतीय जनता पक्षाला किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना तो प्रकल्प इकडे हवाय… पण आपण वेगळी भूमिका घेतली.
का घेतली? ते जरा समजून घ्या. तेथील जनतेसाठी घेतली.
परवा जेव्हा मुख्यमंत्री पुन्हा तिकडे गेले… जनादेश यात्रेला… तेव्हा त्यांनी परत तीच भूमिका मांडली की, मला इथे प्रकल्प हवाय…पण शिवसेनेच्या भूमिकेमुळे मला तो काढावा लागला.
– माझी भूमिका ही जनतेच्या सोबत राहण्याची आहे. तिथे मुख्यमंत्र्यांनी हे बोलल्यानंतर जो काही जनक्षोभ उसळला, ज्या क्रिया-प्रतिक्रिया तिथे उमटल्या… म्हणजे दंगल नाही झाली… पण सर्वसामान्य माताभगिनींच्या ज्या काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या, त्या फार उद्विग्न होऊन आणि चिडून बोलताहेत… हा काही खेळ नाही… दिला… काढला…तो प्रकल्प तिकडून गेलेला आहे. शिवसेनेची भूमिका ही माझी व्यक्तिगत किंवा माझ्या व्यक्तिगत स्वार्थाची, शिवसेनेच्या स्वार्थाची नाही. जर जनतेला एखादी गोष्ट हवी असेल तर ती पाहिजे. नको असेल तर त्यांच्यावर ती लादता कामा नये… जसं समृद्धी महामार्ग आहे… समृद्धी महामार्गालासुद्धा विरोध झाला… मी स्वतः तिकडे गेलो… एकनाथ शिंदेंना तिथे पाठवलं… आणि अक्षरशः मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी आहेत की, फळांनी लगडलेली झाडं ही सरकारी बाबूंनी खडकाळ जमीन म्हणून जाहीर केली आहेत… हे सरकारी बाबू आहेत… हे कागदोपत्री फक्त वीर असतील… पण राजकारणी जे आहेत ते तळागाळातले असतात.
आपण मेट्रो कारशेडला विरोध करताय…
– कारशेडला अजिबात नाही विरोध करत… जागेला विरोध करतोय.
‘आरे’संदर्भात शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे…
– नक्कीच. एक गोष्ट अशी आहे…
हे आंदोलन सरकारविरोधी आहे…
– नाही…मी पुन्हा एकदा सांगतो… समृद्धी महामार्गाचंच उदाहरण मी पुन्हा देईन. तेथेही जनतेचा विरोध होताच. आम्हीच सगळं शांत केलंय. त्या शेतकर्यांशी बोलून, जिथे जिथे जे जे करणं शक्य होतं, ते ते करून… म्हणजे काही ठिकाणी त्या फळबागा वाचवून रस्ता बदलला.
म्हणजे सकारात्मक मार्ग काढला?
– सकारात्मक मार्ग काढला. माझं तेच म्हणणं आहे… की विकास म्हणजे कोणाचं थडगं बांधणं नाही. आज आरेच्या कारशेडला शिवसेनेचा जो विरोध आहे तो शिवसेनेचा नाही. तो मुंबईकरांचा आहे. म्हणजे कोणी मुंबईकरांनी असं समजू नये की, हा शिवसेनेचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुमच्यासाठी आम्ही लढतो आहोत, आपण सगळे मुंबईकर आहोत. मेट्रो पाहिजेच… विकास पाहिजेच… पण काहीतरी कमवताना जे अधिक मोलाचं आहे ते गमावणं हा त्याचा अर्थ नाही. मुंबई हे जगातलं एकमेव शहर असं आहे की, ज्या शहरामध्ये नैसर्गिक जंगल आणि त्याच्यामध्ये वनसंपत्ती आहे. वनसंपत्ती म्हणजे वन्य प्राणीसुद्धा आहेत. असं जगाच्या पाठीवर कोणतंही शहर नाही.
आणि आपण सरकारमध्ये असूनही वेगळी भूमिका घेताय…
– आहेच ना… ही वेगळी भूमिका जनतेतून आलेली आहे. माझ्या बागेतली झाडे नाही तुटली. माझ्या बागेतल्या झाडांवरती मेट्रो कारशेड अवलंबून नाहीये. जर ही काही वनसंपत्ती असेल, त्यातसुद्धा अनेकांनी, तज्ञांनी मान्य केलेलं आहे की, तिकडे काय काय आहे. तर तुम्ही किंमत कशावर ठरवता? हे सरकारी बाबू जे आहेत, हे म्हटलं तर सुशिक्षित आहेत. म्हटलं तर अडाणी आहेत. याचं कारण असं की, उद्या मुंबईची विल्हेवाट लागली तर हे कुठे असतील? कुठेतरी बंगले बांधून, त्या बंगल्यात टीव्ही लावून, एअरकंडिशनर लावून बघत बसतील, की मुंबई कशी बुडाली!
आज झाडं तोडायला घेतली तिथे…
– मग तेच आहे ना. याच्यामध्ये हा जो आक्रोश आहे… हा शिवसेनेचा एकटय़ाचा विषय नाहीये. संपूर्ण मुंबईकर यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजेत.
झाडं तुटताहेत ज्या पद्धतीनं… तोडायला मध्यरात्री सुरुवात केली, काळोखात. याची गरज होती का?
– अजिबात नाही. हे जे कुणी खुनी अधिकारी तिकडे बसलेत… झाडांचे खुनी आहेत हे, त्यांना याची किंमत मोजावी लागेल. किंमत भोगावी लागेल. यशवंत जाधव यांनी याचिका केल्यावर ती निकाली काढताना 50 हजारांचा दंड त्यांना झाला. ठीक आहे, ही त्या याचिकेची किंमत झाली किंवा दंड झाला. पण हे पर्यावरणाचं नुकसान जे आहे त्याचं मोल या झाडाच्या खुन्यांना मोजावं लागेल आणि जर का उद्या मुंबईवरती आपत्ती आली, मुंबईत पुन्हा तुंबातुंबी सुरू झाली… तर कोण जबाबदार? मला आता या वादात जायचे नाही, पण याला जबाबदार हे अधिकारी असणार. पण मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. त्यांनी यावर वेगळी भूमिका घेतली आहे.
उद्धवजी, काँग्रेस आणि एनसीपी पाच वर्षे सत्तेमध्ये नाहीत. जशी मागची पाच वर्षे राहुल गांधी सत्तेमध्ये नव्हते. तरीही नरेंद्र मोदी यांचा प्रचाराचा संपूर्ण रोख हा राहुल गांधी यांच्यावर राहिला, सोनिया गांधींवर राहिला, काँग्रेसवर राहिला. त्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षात आहे. आजही तुम्ही प्रचाराचा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादीचा मागच्या पाच वर्षांचा कारभार हाच ठेवणार?
– प्रश्न तुमचा हा दोन्ही पक्षांना विचारला पाहिजे. म्हणजे शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी. जर ते शिवसेना-भाजपला टार्गेट करणार असतील तर आम्हालाही त्यांना टार्गेट करावे लागेल. जर ते आमच्या पाच वर्षांच्या कारभारावर बोलणार असतील, तर आम्हालाही त्यांच्या पन्नास वर्षांच्या नाकर्तेपणावर, किंबहुना भ्रष्टाचारावर बोलावे लागेल. विषय सरळ आहे… ते जर का आम्हाला टार्गेट करत असतील तर आम्ही काय हात जोडून त्यांना सामोरे नाही जाणार.
काँग्रेस-राष्ट्रवादीचं विरोधी पक्ष म्हणून राज्यात स्थान काय आहे? मी विरोधी पक्ष म्हणून विचारतो…
– (हसत)… सगळ्या गोष्टी मी आता नाही बोलणार… काही थोड्याशा मला दसर्यासाठी ठेवायच्या आहेत…
कारण अनेकदा विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेने वठवली आहे…
– तुमच्या प्रश्नात उत्तर आले ना… विरोधी पक्षनेता कुठाय आता? विरोधी पक्ष नेत्याचं काय झालं… म्हणजे त्यावेळी होता तो.
या लोकशाहीतला हा सर्वात मोठा घोटाळा आहे…
– म्हणा तसंही तुम्ही… शेवटी हे मी म्हटलं तसं लोकशाहीतलं युद्ध आहे, बरोबर आहे… त्याच्यामध्ये त्याही वेळेला ते बिभीषण विभीषण तिथले इथे, इथले तिथे आलेच होते. ते आता याबाबतीत येताहेत.
सध्या देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेचा विषय कुठला असेल तर ‘ईडी.’ म्हणजे राजकारणात काही झालं तरी ‘ईडी’कडे बोट दाखवलं जातं. आपलं काय मत आहे?
– (हसत)… बघा, आपल्याकडे काय ती म्हण आहे ना की, ती इडा पीडा टळो… तसंच ती ईडीची पीडा टळो… आता हे नवीन सुरू होईल. परखडपणे सांगायचं तर, सत्तेचा आणि अधिकाराचा दुरुपयोग किंवा गैरवापर होता कामा नये. सूडाने कोणी राज्य करू नये या मताचा मी आहे!
पण शरद पवार यांच्याबाबतीत जो प्रकार झाला मधल्या काळात… अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं… आणि शेवटी ‘ईडी’ला माघार घ्यावी लागली…
– असाच प्रकार 2000 साली बाळासाहेबांच्या बाबतीत झाला होता आणि त्याचं कारण जो अग्रलेख ‘सामना’तच आला होता. तेव्हा दहा वर्षांपूर्वीचा होता. आता तर हा गडबड घोटाळ्याचा कारभार आहे आणि याच्यामध्ये कोणी केस केली ते पण बघण्यासारखं आहे. बरोबर आहे? ही केस कोणी केलीय? मग त्याचं पुढे काय झालं? सूडाने, सूडबुद्धीने जर का सरकार वागत असेल तर मी म्हणेन ते चूक आहे. पण त्यावेळेला अटलजींचं सरकार होतं केंद्रात, पण राज्य सरकारने इथे हट्ट धरला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते… उपमुख्यमंत्री कोण होते ते तुम्हाला माहीत आहे, गृहमंत्री कोण होते ते तुम्हाला माहीत आहे. आरोप काय होता? दहा वर्षांपूर्वी मुंबईतल्या जातीय दंगलीत हिंदूंना वाचवणं हा गुन्हा. हे कर्तव्य कोणाचं होतं? त्यावेळेला सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. नंतर तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांचं काम होतं मुंबई शांत ठेवण्याचं. ठेवू नाही शकले आणि तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी बहाद्दर शिवसैनिकांच्या मदतीने मुंबईचं आणि मुंबईतल्या हिंदूंचं रक्षण केलं…हा गुन्हा…तो दहा वर्षांपूर्वीचा ‘सामना’चा अग्रलेख काढून त्यांना अटक करणारच…आणि त्याही वेळी आता हे (पवार) जसे ईडीपुढे गेले आणि ईडी घाबरली. तेव्हा स्वतः शिवसेनाप्रमुख कोर्टासमोर गेले होते आणि कोर्टाने केस उचलून फेकून दिली होती. म्हणजे असं काही नाही की, यांनी शौर्य पहिलं दाखवलेलं आहे. पहिलं शौर्य हे अर्थातच शिवसेनाप्रमुखांनी दाखवलं आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती खरं या विषयाची गरज होती, नव्हती… हा मुहूर्त कोण कसा काढतो मला माहीत नाही. पण जर हे सूडबुद्धीने असेल तर ते त्या वेळेला याहीपेक्षा अधिक सूडबुद्धीचं होतं आणि हिंदूंना वाचवणं हा गुन्हा मानणं हा गुह्यापेक्षाही अधिक मोठा गुन्हा आहे. आपल्या देशात हिंदूंचं रक्षण करणं हा जर त्यांच्या लेखी गुन्हा असेल तर या ईडीच्या गुह्यापेक्षा तो मोठा गुन्हा आहे.
सध्या ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’चा वापर राजकारणासाठी होत आहे.
– ‘ईडी’चे मला माहीत नाही. पण ‘सीबीआय’चा राजकीय वापर काही आजच होत नाही. जे काल पेरले तेच आता उगवत आहे.
राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी ‘ईडी’चा वापर होत असल्याचा आरोप होतोय.
– कोण हे राजकीय विरोधक? शेवटी ज्यांचे हात बरबटलेले आहेत, कुठेतरी गुंतले आहेत त्यांच्याच नाड्या आवळल्या जाणार. चिदंबरमचेच उदाहरण घ्या. किती कोटींचा व्यवहार झालाय? तुम्ही ते कोटीकोटीचे आकडे मोजू शकता काय? राज्याच्या शिखर बँकेत कर्जवाटपात गडबड आहेच. अगदी छगन भुजबळही ‘ईडी’च्या जाळय़ात अडकले. पण साधुसंतांवर कोणी हात टाकत नाही व ज्यांच्यावर ‘ईडी-पिडी’ झाली तेसुद्धा धुतल्या तांदळासारखे नाहीत हे मान्य कराल काय?
तुमच्यावर सुद्धा ‘ईडी’चे दबाव प्रकरण झाले…असे सांगतात.
– काय ते ईडी? मला नका सांगू त्या गोष्टी. कर नाही त्याला डर कशाला? मी लढणार्या पित्याचा लढणारा पुत्र आहे. माझे आजोबासुद्धा योद्धा होते. मी घाबरत नाही. उगाच भलतेसलते प्रयोग करू नका.
उद्धवजी, सत्ता येणारच आहे महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची आणि वारंवार आपण जे सांगताय की, मला नवीन महाराष्ट्र घडवायचाय, पण आज सत्ता आहे महाराष्ट्रात. ठीक आहे, पूर्ण सत्ता नसेल. सत्ता असूनही राज्याला कोणते प्रश्न भेडसावतात? सत्ता आहे तरीही प्रश्न संपलेले नाहीत.
– एक पहिली गोष्ट सांगतो, याचं कारण एक प्रामाणिकपणानं मान्य केलं पाहिजे की, गेली पाच वर्षे जे सरकार होतं त्यात आम्ही जरूर होतो आणि नरम-गरम असे सगळे आमचे संबंध आहेत ते लोकांनी बघितलेले आहेत. जिथे जिथे आम्हाला अयोग्य वाटलं, तिथे तिथे आम्ही आवाज उठवला आहे. परंतु सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखं असं सगळं ते होतं. आता युती जर का केली, मघाशी जे म्हटलं ना, की तडजोड केली का… ठीक आहे, मी महाराष्ट्रासाठी केली म्हणा पाहिजे तर. पण आता संबंध सुधारले असतील तर या सगळ्या पाच वर्षांच्या अनुभवातून अधिक चांगलं सरकार आणि कारभार आम्ही देऊ शकतो. हा एक नाही म्हटला तरी आत्मविश्वास आहे. कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यामागे काय अनुभव होता? आपले शिवसेनेचे मंत्री झाले, त्यातले काही मंत्री पूर्वी होते, पण अन्यथा आपल्याकडे तसा काही अनुभव नव्हता. मग पाच वर्षांमध्ये आता काही गोष्टी ज्या पुढे सरकवलेल्या आहेत त्या अधिक वेगाने नेऊ शकतो.
महापुराचं संकट येऊन गेलं. अजूनही त्या महापुरातून लोक सावरलेले नाहीत. काही ठिकाणी सरकार कमी पडलं. मराठवाड्याला दुष्काळ अजूनही भेडसावतोय. काही ठिकाणी पूर आहे, काही ठिकाणी दुष्काळ आहे. सरकार या प्रश्नांची उकल करण्यामध्ये कमी पडत आहे असं वाटतं का?
– निसर्गाचं हे एक चक्र आता दिसतंय आपल्याला. म्हणजे मी काही त्याच्यावर ढकलून मोकळा होत नाही.
महापूर हा मानवनिर्मित होता…
– सांगतो ना. ज्या प्रमाणात पाऊस पडला, अगदी मुंबईमध्येसुद्धा, महिन्यामहिन्याचा पाऊस एकेक-दोनदोन दिवसांत पडतो. ढगफुटी होते. हे प्रकार वाढताहेत. हे पुण्यातसुद्धा झालं परवा. नागपूरमध्ये झालं. दिल्लीत होतात, अहमदाबादला होतात, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, जपान… सगळीकडे होतात. हे जे काही दुष्टचक्र आपल्या जगाच्या पाठी लागलं आहे… त्याच्यामागे मग आपण त्याचे निष्कर्ष काढतो की, आपण जी काही निसर्गाची हानी करतो आहोत… म्हणजे ही आपली सुधारणा की आपल्याला कळतं की निसर्गाची जी काही हानी आपण करतो त्याच्यामुळे ही संकटं ओढवताहेत आणि पुन्हा जंगल तोडून विकास करतो ही आपली अक्कल… त्याच्यामुळे जोपर्यंत आपण सुधारत नाही, त्याच्यात सुविधा किती तुम्ही निर्माण करणार? आणि किती करायचं म्हटलं तरी निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही. मुंबईचासुद्धा पाऊस असेल किंवा इतरत्र जो काही पाऊस पडतो… जसा मध्ये ठाणे, नाशिक या पट्टय़ात पाऊस पडला, कोल्हापूरमध्ये पडला. म्हणजे हे विचित्र झालंय. ढगफुटी… म्हणजे गेल्या वेळी तर कुणाला कल्पनाही नव्हती. मुंबईवरती 9 किलोमीटर उंचीचा पूर्णपणे पाण्याने भरलेला ढग होता आणि तो जर का फुटला असता तर काय झालं असतं?
आर्थिक मंदीचं संकट या देशावरती मोठं आहे हे आपण मान्य करता?
काय ते ईडी? मला नका सांगू त्या गोष्टी. कर नाही त्याला डर कशाला? मी लढणार्या पित्याचा लढणारा पुत्र आहे. माझे आजोबासुद्धा योद्धा होते. मी घाबरत नाही. उगाच भलतेसलते प्रयोग करू नका.
शिवसेनेने सरकारला कधीही दगा दिला नाही. मी सरकारसमोर प्रश्न घेऊन उभा राहिलो. याहीपुढे प्रश्न मांडायचे असतील तर मी जरूर मांडेन… पण सरकारला मी कुठे दगाफटका होऊ दिला का? सरकार पाडण्यासाठी काही कलागती केल्या का? अजिबात केल्या नाहीत, की सरकार आता पडेल… हे पाप मी नाही केलं. मी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड कधीही आलेलो नाही.
मी महाराष्ट्राला एकच सांगेन की, जे काही मी करतो ते माझ्या स्वतःसाठी काही करत नाही. बर्याचदा मी रात्री-रात्री अस्वस्थ असतो की, जे काही मी करतोय त्याने माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल? माझ्या महाराष्ट्राला काय वाटेल? पण एक लक्षात घ्या, हे करण्यामध्ये माझ्या मनात कोणतेही पाप नाही.
– मी मान्य केलं नाही तरी मंदी राहणार किंवा जाणार आहे?
हे मान्य केलं जात नाही…
– नाही आहेच… मंदी आहेच. नाकारून काय होणार?
आर्थिक मंदीमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये उद्योग बंद पडताहेत. मग ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, बांधकाम व्यवसाय असेल, आयटी क्षेत्र असेल… हे सगळे आर्थिक मंदी आणि नोटाबंदीचे दुष्परिणाम आपण आज भोगतो आहोत. महाराष्ट्राला त्याचा सर्वात मोठा फटका बसतोय, खास करून मुंबईतल्या रोजगाराला. याच्यावरती आपल्याकडे काय उपाययोजना आहे?
– हा प्रश्न खरं तर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा. हे म्हणजे तुम्ही पाचवीच्या विद्यार्थ्याला दहावीचा प्रश्न विचारताय.
आपण नोटाबंदीवर भूमिका घेतली होती…
– होय, घेतली होती. आता त्यावेळेला सगळ्यांनी मला वेड्यात काढलं असेल. मी म्हटलं, माझं अडाण्याचं अर्थशास्त्र आहे.
आर्थिक मंदी आहे, पण जीडीपी वाढतोय…
– म्हणजे काय वाढतोय… हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. नक्की वाढतंय ते त्यांनाच माहीत.
आर्थिक क्षेत्रातले प्रमुख लोक जे सरकार पाहताहेत त्यांची अशी भूमिका आहे की, आर्थिक मंदी वगैरे नाही. या देशात आणि राज्यात सर्व आलबेल सुरू आहे आणि जीडीपी नावाचा प्रकार हा वाढतोय, शेअर बाजार उसळी मारतोय, पण नोकर्या तर जाताहेत. तुम्ही याचं विश्लेषण कसं करणार?
– याचं विश्लेषण म्हणजे, प्रामाणिकपणे तुम्ही बोलता ते…आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे…आर्थिक मंदी आहे की नाही ते नंतर बघूया…पहिल्याप्रथम नोकर्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत, तर हे दिसतंय ते तरी स्वीकारू. आहे ते बंद पडू नये आणि नवीन काही यावं याच्यासाठी आपल्याला काही धोरणं आखायची गरज आहे का हे ठरवणं आणि हे ठरवल्यावर तसं वागणं आणि अमलात आणणं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की, याच्यामध्ये कोणीही आपल्या प्रतिष्ठsचा प्रश्न करू नये. शेवटी देश असला तर आपण आहोत. राजकारण करणं म्हणजे नुसतं एका भूभागावर सत्ता गाजवणं नव्हे…त्या भूभागावर जे लोक राहतात त्यांना न्याय देणं, त्यांच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवणं आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून सामंजस्याने…माझं तर म्हणणं आहे की, सगळ्यांनी एक आवाहन करावं, की समजा मी सत्ताधारी आहे, तुम्ही विरोधक आहात. या ना सगळ्यांनी या. आपण मिळून ठरवूया की, हे जर देशाला खड्डय़ात घालणारं संकट असेल तर सगळ्यांनी एकत्र मिळून पुढे जाऊ शकतो आपण. का नाही जायचं?
त्यासाठी संकट आहे हे मान्य करावं लागेल…
– मी बोललो ना तुम्हाला, की संकट तुम्ही माना किंवा नका मानू. मग असं म्हणा की संकट नाहीये. पण ही परिस्थिती आहे. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी संकट शब्द बाजूला ठेवतो. ही परिस्थिती आहे. अगदी पारले-जी कंपनीलासुद्धा…म्हणजे जे गरीबांचं किंवा सर्वसामान्य लोकांचं बिस्कीट आहे, त्या कंपनीलासुद्धा दहा हजार कामगार कपातीचं धोरण किंवा निर्णय घ्यावा लागला. हे विचित्र आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे, की चला संकट तुम्ही माना नका मानू, पण या परिस्थितीतून बाहेर पडायला देशात आणखी काही चांगलं करायला आपण एकत्र येऊया…
शिवसेना आणि भाजपचं नातं नक्की कसं आहे? आपण काल म्हणालात…
– काय…
नात्याविषयी… नातं टिकवलंय…
– हो नं…
नातं नक्की कसं आहे?
– मी तरी नातं मानणारा आहे. त्याच्यासाठी खेचाखेची किंवा कोणाला झुकवणं, वाकवणं हे मला तरी मान्य नाही. संपूर्ण महाराष्ट्र आज बघतोय. कोणासाठी करतोय… काय करतोय… शिवसेना ही सत्तेसाठी नाहीये. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबईचा महापौर हे लोकांना मोठं स्वप्न वाटत होतं. 71 साली शिवसेनेचा पहिला महापौर झाला. त्याच्यानंतर साधारणतः 85 साली जेव्हा शिवसेना पुढे सरकली, तेव्हा हळूहळू लक्षात आलं की, चांगलं काही करायचं असेल तर सत्ता ताब्यात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे चांगलं काही करण्यासाठी म्हणून सत्ता आपल्याला पाहिजे. शिवसेनाप्रमुखांचे जे धोरण आहे… 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, त्या समाजकारणामध्येसुद्धा 20 टक्के राजकारणाची जोड पाहिजे. कारण ते जर असेल तर आपण खूप मोठी कामं करू शकतो.
मी नात्याविषयी यासाठी प्रश्न विचारतो, उमेदवारी भरण्याची काल शेवटची तारीख होती आणि महाराष्ट्रात सर्वत्र शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी एकमेकांच्या विरुद्ध अर्ज भरले. हा एक प्रकारचा उद्रेक आहे.
– ठीक आहे…काँग्रेस-राष्ट्रवादीत किती आहे?
तुलनेत कमी दिसतोय…
– म्हणजेच याचा अर्थ की, राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन प्रबळ पक्ष आहेत हे सगळ्यांना मान्य करायला पाहिजे. हे प्रबळ केव्हा होतात, जेव्हा त्यांच्याकडे एकापेक्षा एक असे सरस कार्यकर्ते असतात आणि त्या कार्यकर्त्यांची इच्छाही असू शकते. इच्छा, महत्त्वाकांक्षा बाळगणं हे…
ही बंडखोरी आहे असं नाही वाटत?
– महत्त्वाकांक्षा बाळगणं हा काही गुन्हा नाहीये. साहजिकच आहे, एखादा कार्यकर्ता एखादा मतदारसंघ जर त्याच्या कामाने बांधून सगळी निवडणुकीची तयारी करत असेल आणि अचानक उमेदवारी दुसर्याला दिली गेली किंवा ती जागा दुसर्या पक्षाला दिली गेली तर उद्विग्न होणे स्वाभाविक आहे. हे दर निवडणुकीत होतं. पण मला वाटतं की, पुढे जे काही आपल्याला जायचंय ते एकदा या लोकांच्या लक्षात यावं…आणि ते येतं… बहुतेक सगळे नंतर त्या एका जोशात जातात… ती उद्विग्नता असते…कार्यकर्त्यांचा हट्ट असतो आणि तो काही गैर नसतो. पण नंतर त्यांच्या हळूहळू लक्षात येतं की, अरे हे तंगड्यात तंगड्या अडकवल्या तर आपण तर पडूच. पण शेवटी नुकसान कुणाचं होणार आहे आणि म्हणून मला खात्री आहे की, या दोन दिवसांमध्ये यातले जवळपास सगळे हे मी बंडखोर नाही म्हणत, पण ज्यांना कुणाला वाईट वाटलं असेल ते हळूहळू शांत होतील. आम्ही अनेकांना मागे घेतले आहे.
हे शांत जरी झालं तरी कोकणातलं चित्र वेगळं आहे…
– सगळ्यांची उत्तरं मिळतील ना हळूहळू…कोकणातलं धुमशान जरा वेगळं असतं.
कोकणामध्ये एका मतदारसंघात नितेश राणे यांच्या संदर्भात… तिथे आपण अधिकृत एका उमेदवाराला ‘एबी’ फॉर्म दिलेला आहे.
– सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील… एकही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही. काही उत्तरांना थोडासा वेळ लागेल. माझ्या संकटकाळात जे शिवसैनिक माझ्या सोबत राहिले, त्यांची साथ मला मोलाची आहे. मी त्यांना वार्यावर सोडणार नाही.
म्हणजे संघर्ष कायम राहणार?
– मी तुम्हाला म्हटलं तेच…संकट काळात जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिला, माझ्यासाठी म्हणून उभा राहिला…शिवसेनेसाठी उभा राहिला तो मला मोलाचा आहे आणि म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता देऊ शकत नाही. दोन-तीन दिवसांत मिळतील.
2014 साली आपण स्वबळाची भाषा केली होती. चार वर्षे आपण स्वबळासाठी संघर्ष केला…
– बरोबर आहे…
288 जागा लढण्यासाठी आपण पूर्ण तयारी केली. महाराष्ट्रात शिवसेनेचं एक वातावरण निर्माण झालं आणि आता आपण युती केली. शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार जो आपण शिखरावर नेला होता, त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला.
– पूर्णविराम नाही मिळाला. मी मध्यंतरी पण बोललो… की तयारी ही 288 जागांची असायलाच पाहिजे. तयारी म्हणजे केवळ निवडणुका लढवणं, हरणं, जिंकणं नाही… तर जो आपला विचार आहे शिवसेनाप्रमुखांनी दिलेला…त्या विचाराने भारावून गेलेला कार्यकर्ता आणि मतदार हा मला प्रत्येक वॉर्डात पाहिजे. आतासुद्धा 164 की 162 वॉर्ड दिलेत, तिथेसुद्धा शिवसेनेचं काम हे चालूच राहणार आहे.
जर गरज पडली तर परत तुम्ही स्वबळाची भाषा कराल का?
– मला असं वाटतं, सुरुवात जर का चांगली झाली असेल आणि जसं तुम्ही ब्रेकनंतर माझं स्वागत केलंत तसं स्वागत जर का महाराष्ट्रानं केलं असेल तर पुन्हा ब्रेकची आशा आपण कशाला करायची?
ब्रेक तर आपल्या पायाखाली असतो…
– ट्रकवर लिहिलेलं असतं… मनावर ब्रेक उत्तम ब्रेक.
म्हणजे सध्या मनावर ब्रेक आहे.
– सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. कारण जर का कारण नसताना सुसाट गेले तर अपघात होऊ शकतो आणि ते दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवायला पाहिजे. असा अपघात आधी झाला आहे.
पण 24 तारखेनंतर या ब्रेकचं काय होईल?
– चांगली दिवाळी आहे त्याच्यानंतर… विजयाचे फटाके वाजतील.
उद्धवजी, महाराष्ट्राला काय सांगाल आपण?
– मी महाराष्ट्राला एकच सांगेन की, जे काही मी करतो ते माझ्या स्वतःसाठी काही करत नाही आणि मी ज्या वेळेला करतो त्या वेळेला खरोखर मी सांगतो, बर्याचदा मी रात्री-रात्री अस्वस्थ असतो की, जे काही मी करतोय त्याने माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल? माझ्या महाराष्ट्राला काय वाटेल? पण एक लक्षात घ्या, हे करण्यामध्ये माझ्या मनात कोणतेही पाप नाही, कोणतेही काळंबेरं नाही आणि म्हणूनच तुम्ही जे म्हणता, चार-साडेचार वर्षांच्या संघर्षानंतर मी मारला यू-टर्न. मी कोणती गोष्ट लपवत नाही… ताकाला जाऊन भांडं लपवण्याची आमची जातकुळी नाही. ती आमची परंपरा नाही. जे करतोय ते रोखठोकपणे मांडतो आणि जनतेसमोर जातो. मला जनतेसमोर जायला लाज वाटली नाही याचे कारण… माझ्या मनात काही पाप नव्हतं आणि मला खरंच कौतुक वाटतं, शिवसैनिकांनी माझी भूमिका, माझा निर्णय मानला. महाराष्ट्राच्या जनतेने याचं स्वागत केलंय. नाहीतर लोकसभेमध्ये हे जे काही अस्थिरतेचं चित्र होतं ते शिवसेनेमुळे पुसलं गेलं आणि पुन्हा एकदा भगवा या देशाच्या लोकसभेवर फडकला. तोच भगवा या महाराष्ट्राच्या विधानसभेवरही आम्ही फडकवूच.
शिवसेनेसाठी उभा राहिला तो मला मोलाचा!
मी मध्यंतरी पण बोललो… की तयारी ही 288 जागांची असायलाच पाहिजे. तयारी म्हणजे केवळ निवडणुका लढवणं, हरणं, जिंकणं नाही… तर जो आपला विचार आहे शिवसेनाप्रमुखांनी दिलेला…त्या विचाराने भारावून गेलेला कार्यकर्ता आणि मतदार हा मला प्रत्येक वॉर्डात पाहिजे. आतासुद्धा 164 की 162 वॉर्ड दिलेत, तिथेसुद्धा शिवसेनेचं काम हे चालूच राहणार आहे.
(समाप्त)
होय, शिवसैनिक मुख्यमंत्री होईल; उद्धव ठाकरे यांची कडक आणि बेधडक मुलाखत




























































