उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व फॉर्म्युले मीडियानेच तयार केलेत… दोन दिवस थांबा, सर्वकाही कळेल!!

3334

विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही इथपासून जागावाटपाच्या फॉर्म्युल्यापर्यंत वेगवेगळ्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असतानाच शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना-भाजपात कोणतीही कटकट नसून युतीचा फॉर्म्युला आधीच ठरलाय’ असे स्पष्टपणे सांगितले. सर्व फॉर्म्युले मीडियानेच तयार केलेत. दोन दिवस थांबा, सर्वकाही कळेल, असेही उद्धव ठाकरे पत्रकारांना म्हणाले.

राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांची आढावा बैठक आज शिवसेना भवनात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युती आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांचे उद्धव ठाकरे यांनी खंडन तर केलेच, पण लोकसभा निवडणुकीआधीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे, असे स्पष्टपणे सांगितले. युतीमध्ये कोणताही तिढा नसून येत्या एक-दोन दिवसांत युतीची घोषणा होईल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्रीच शिवसेनेची यादी देतील

मी यावेळी वेगळी पद्धत अवलंबली आहे.  जो काही फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेची यादी तयार करावी हे मी त्यांना सांगितलं आहे. त्यानुसार एक-दोन दिवसांत ते यादी देतील. यादी मी पक्षासमोर ठेवेन आणि नंतर निर्णय घेऊन ती घोषित करू, याचा उद्धव ठाकरे यांनी आजही पुनरुच्चार केला. तेव्हा आपण हे उपहासाने बोलत आहात का? असा सवाल पत्रकारांनी केला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, बिलकुल नाही. राजकारणात उपहास किंवा उपवास असं काही नसतं.

निवडणुकीपूर्वी अयोध्येला जाण्याची इच्छा

उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले आणि अयोध्यावासीयांशी संवाद साधला आहे. आताही विधानसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत जाण्याचा विचार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्याबाबत मी याआधीच बोललो आहे. अयोध्या दौरा आताच जाहीर करत नाही, पण इच्छा जरूर आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या