काँग्रेसने कितीही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत!

1287

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व म्हणजे जाज्वल्य राष्ट्रवाद होता. सावरकर म्हणजे एक विचार होता. काँग्रेसने कितीही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत. तो स्वातंत्र्यसूर्य सदैव तळपत राहील, असे प्रशंसोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. देशासाठी त्याग करणार्‍या सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळालेच पाहिजे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

विक्रम संपत लिखित व पेंग्विन प्रकाशित ‘सावरकर इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे मंगळवारी झाले. त्याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत आपल्या हस्ते अनेक पुस्तकांची प्रकाशने झाली, पण आज सावरकर यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन होतेय हे आपले भाग्य आहे.  सशस्त्र क्रांतीच्या इतिहासात आदर्शवत असे सावरकर म्हणजे एक चमत्कार होता. त्यांचे वर्णन एका शब्दात करता येणार नाही, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सावरकर आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व हे विज्ञाननिष्ठ होते. दोघांनीही नेहमीच हिंदू धर्मातील वाईट प्रथांवर प्रहार केले. चंद्रावर यान उतरलेय आणि मंगळावरही माणूस शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे आणि इथे माणसे मात्र पत्रिकेत मंगळ शोधत आहेत. सावरकर हे मंगळावर माणूस शोधणारे होते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाची प्रशंसा केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात मरणयातना सहन केल्या. 1924 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतरचा काळ तर त्यांच्यासाठी मरणयातनेपेक्षा भयंकर असेल. कोणत्याही राजकीय चळवळीत त्यांना बंदी घातली गेली. त्यांना स्थानबद्ध केले गेले. तरीसुद्धा अस्पृश्यता निवारणाचे त्यांचे कार्य सुरू होते. त्यांना पंतप्रधान पदापासून मुद्दामहून दूर नाही ना ठेवले असाही संशय येतो. नेहरूंनी तुरुंगवास भोगला असे सांगितले जाते; पण सावरकरांसारखा तुरुंगवास त्यांनी 14 मिनिटे जरी भोगला असेल तर मी त्यांना ‘वीर जवाहरलाल नेहरू’ म्हणायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, पुस्तकाचे लेखक विक्रम संपत, माजी खासदार भारतकुमार राऊत, सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर आदी उपस्थित होते. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी आपण मुंबईसह देशात आणि परदेशातही संशोधन केले असे सांगताना संपत यांनी, आपण मागे वळून स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासाकडे पाहिले पाहिजे अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळेल असा विश्वास व्यक्त केला. विधिमंडळाच्या वाचनालयात हे पुस्तक असावे याकडे आपण आवर्जून लक्ष देऊ, असे डॉ. गोऱहे यावेळी म्हणाल्या. तर हे पुस्तक मराठी भाषेत आले तर महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी लोक निश्चितच वाचतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सावरकरांच्या पुतळय़ाला जोडय़ांचा हार घालणार्‍यांना येत्या निवडणुकीत ते जोडे साभार परत करा, असे आवाहन यावेळी रणजित सावरकर यांनी उपस्थित लोकांना केले.

पुस्तकाच्या प्रती सर्व शाळांना भेट देणार

विक्रम संपत यांच्या या पुस्तकाच्या प्रती आपण विकत घेऊन सर्व शाळांना भेट देणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशातील सर्व खासदार आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही हे पुस्तक भेट दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

हे पुस्तक बेअकल्या राहुल गांधीला द्या!

सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या बेअकल्या राहुल गांधीला हे पुस्तक वाचायला द्या. त्याच्याकडे आता खूप वेळ आहे. पंतप्रधान बनायला निघालास तर आधी आमच्या देशातील नररत्नांनी किती बलिदान दिले आहे ते बघ. त्यांच्यामुळे आज तुम्ही आहात, नाहीतर बसला असतास कापूस पिंजत.

सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्माला आला नसता!

आज प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीबरोबरच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनही आहे. वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त केला. वल्लभभाईंना लोहपुरुष म्हटले जाते. ते पंतप्रधान असते तर कश्मीरचा प्रश्नही निर्माण झाला नसता असे म्हणतात आणि सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या