70 वर्षांच्या आजीबाई आई झाल्या, जुळ्या मुलांना जम्न दिला

मुलं होण्यासाठी योग्य वय 23 ते 35 वर्ष असावे असे म्हटले जाते. बहुतेक स्त्रिया 35-40 वर्षांच्या होण्यापूर्वी आई बनण्यास प्राधान्य देतात. कारण यानंतर गरोदरपणात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आजकालच्या काळाज आधुनिक तंत्रज्ञानामुळे चाळिशी किंवा पन्नाशीतील महिलाही आई झाल्याचे ऐकायला मिळते. युगांडामध्ये मात्र 70 वर्षांच्या महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे.नातवंडे खेळवण्याच्या वयात ही महिला आई झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटते आहे. सफिना नामुकवाया असं या महिलेचे नाव आहे.

युगांडातील एका रुग्णालयात या महिलेने आयव्हीएफ उपचारानंतर जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. सफिनाने मुलगी आणि एका मुलाला अशा दोन सुदृढ बाळांना जन्म दिला. वुमेन्स हॉस्पिटल इंटरनॅशनल अँड फर्टिलिटी सेंटर (WHI&FC) मधील प्रजनन तज्ज्ञ डॉ. एडवर्ड तामाले साली यांनी याबाबत बोलताना म्हटले की हा एक चमत्कारच आहे. बाळांना जन्म देणाऱ्या संपूर्ण टीमचं आणि त्या आईचे मी अभिनंदन करतो. सफिना यांच्या इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) प्रक्रियेसाठी स्त्री बीज आणि त्यांच्या जोडीदाराच्या शुक्राणूंचा वापर केला होता. दोन्ही बाळं आणि आई तिघेही सुखरुप आहेत असे ते म्हणाले.

गर्भधारणा फार कठीण होती
सफिना यांच्यासाठी ही गर्भधारणा फार कठीण होती. सफिना यांच्या साथीदाराला जेव्हा कळाले की त्यांना जुळी मुले होणार आहे तेव्हा त्यांनी सफिनाला सोडून दिले होते. सफिना या एका मुलीची आई असून जुळी बाळे झाल्यामुळे आता त्या 3 मुलांच्या आई बनल्या आहेत. त्यांची पहिली मुलगी 2020 साली जन्माला आली होती. मूल होत नसल्याने सफिना यांना आयुष्यभर टोमणे सहन करावे लागले होते. जवळच्या व्यक्तींनीही त्यांचा मूल होत नसल्याने सतत पाणउतारा केला होता.  माझ्या उतारवयात मला सांभाळण्यासाठी कोणीच नसल्याने मी मुले जन्माला घालण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.