अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावीच लागेल, विद्यार्थी, पालकांच्या विरोधानंतरही यूजीसीचा हेका कायम

3404
(फोटो - चंद्रकांत पालकर, पुणे)

देशभरातील विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच राज्य सरकारांच्या विरोधानंतरही विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा हेका कायम ठेवला आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा दोन्ही प्रकारे परीक्षा घ्या पण 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्यायला हव्यात असे सांगतानाच यूजीसीने परीक्षेच्या वेळी घेण्याच्या सुरक्षा उपायांच्या सूचनाच जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संतापाबरोबरच संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोनाचे संकट गंभीर बनले असतानाही यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सक्ती केल्याने त्याचे तीव्र पडसाद सोशल मिडीयावर उमटत आहेत. विद्यार्थीवर्ग यूजीसीवर टीका करत आहे. विद्यार्थी ांघटना तर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. असे असतानाही यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना परीक्षा काळात काय काळजी घ्यावी त्याबद्दल सूचना दिल्या आहेत.

यूजीसीची सक्ती दुर्दैवी माजी अध्यक्षांची प्रतिक्रिया
विद्यार्थी, पालक, शिक्षकांनीही परीक्षा घेऊ नये अशी मागणी केली असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा सक्तीने घेण्याची यूजीसीची भूमिका दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया यूजीसीचे माजी अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केली. परीक्षेच्या महत्वाबद्दल शंकाच नाही पण देशात आरोग्य आणीबाणी असल्यामुळेच परीक्षा रद्द करण्याच्या शिफारशी केल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले. सतत परीक्षा पुढे ढकलण्यापेक्षा गुणांकनाची पर्यायी पध्दत अवलंबणे योग्य ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

अशा आहेत सूचना…
– विद्यार्थ्यांना देण्यात आलेले हॉल तिकीट आणि ओळखपत्र पाहून त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात यावा.
– परीक्षा केंद्रातील प्रत्येक मजला, वर्ग, प्रवेशद्वार, दरवाजे यांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. प्रवेशद्वार, वर्ग आणि स्टाफ रुमबाहेर सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवण्यात यावेत.
– प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक कर्मचाऱयाची थर्मल तपासणी करण्यात यावी आणि त्यानंतर नवे मास्क आणि ग्लोव्हज् घातल्याशिवाय त्यांना प्रवेश देऊ नये.
– प्रत्येक पेपरनंतर वर्गातील आसनांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. स्वच्छतागृहातही सफाई आणि निर्जंतुकीकरणाची काळजी घेण्यात यावी

आपली प्रतिक्रिया द्या