उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला, मोहोळमधील शेकडो एकरांतील पिके वाहून गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे गेल्या चार दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी पहाटे मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे उजनीचा उजवा कालवा फुटल्याने आजूबाजूच्या शेकडो एकरांतील पिके वाहून गेली. द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले. कालव्यातील वाहून आलेल्या पाण्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते.

उजनी धरणातून गेल्या चार दिवसांपासून शेतीसाठी डाव्या व उजव्या कालव्यांतून पाणी सोडते जात आहे. सुमारे 1250 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पाण्याच्या वेगामुळे आज पहाटे मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे खरातवस्तीजवळ उजवा कालवा फुटला. त्यामुळे आजूबाजूच्या शेतात वेगाने पाणी शिरले. या पाण्यामुळे अनेक शेतकऱयांच्या शेतातील पिके वाहून गेली, तर अनेकांच्या शेतात उभ्या पिकांत पाणी थांबल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पाण्याचा द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांना मोठा फटका बसला आहे.

z जवळपास 30 वर्षांपूर्वी हा कालवा तयार झाला असून, दुरुस्तीअभावी फुटल्याची चर्चा शेतकऱयांत सुरू होती. हातातोंडाशी आलेल्या ऊस, द्राक्ष, डाळिंब व अन्य पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या शेतातील विहिरींत या कालव्यातील गाळासह पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वस्तीवर असलेल्या शेतकऱयांच्या घरांतही पाणी शिरले असून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.