पडघम उत्सवाचे – ‘मुंबईचा राजा’ या वर्षी उज्जैनच्या महाकाल मंदिरात विराजमान होणार

दरवर्षी विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविणाऱ्या लालबागच्या  गणेशगल्लीत यंदा कोणते तीर्थक्षेत्र अवतरणार, याची उत्सुकता तमाम गणेशभक्तांना असते. या वर्षीही गणेशगल्लीचा ‘मुंबईचा राजा’ एका वेगळय़ाच रूपात गणेशभक्तांना पाहायला मिळणार आहे. उज्जैनमधील भव्यदिव्य अशा महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीत मुंबईचा राजा थाटात विराजमान होणार आहे.

यंदा गणेशगल्ली मंडळाचे हे 97 वे वर्ष आहे. या वर्षी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा प्रतिकृती देखावा भव्यदिव्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायबरपासून बनवलेली ही प्रतिकृती जवळपास 120 फूट उंच आणि 150 फूट रुंद अशा विस्तीर्ण स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. मंदिराची प्रतिकृती ही प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते   साकारत आहेत. ज्या भाविकांना प्रत्यक्ष उज्जैन येथे जाऊन महाकाल मंदिराचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी ही एक अनोखी पर्वणीच आहे.

यंदाचा देखावा हा उज्जैनमधील महाकाल मंदिराची प्रतिकृती जरी असली तरी भक्तांना त्या मंदिराची प्रत्यक्ष अनुभूतीच इथे येणार आहे, असा विश्वास मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, भविष्यामध्ये ही कलाकृती आणखीही इतर ठिकाणी वापरली जाऊ शकते.

भक्तांना वेगळे काहीतरी पाहता यावे, त्यांना तीर्थक्षेत्रांची माहिती व्हावी, तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा अनुभव मिळावा यासाठी मुंबईचा राजा मंडळाचा प्रयत्न असतो. म्हणूनच दरवर्षी वेगळेपण पाहायला मिळते.

मान्यवरांना आरतीचा मान

नेहमीप्रमाणे यंदाही गणरायांच्या आरतीचा मान हा समाजातील विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना देण्यात येणार आहे. त्यात सर जे.जे. रुग्णालय आणि टाटा रुग्णालयातील परिचारिका, तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे, जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साटम, भरत गोठुस्कर, इतिहास तज्ञ, नाना शंकरशेट यांचे वंशज यांसारख्या समाजातील मान्यवरांना आरतीचा मान देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मानाच्या आरतीची सांगता सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या आरतीनेच होणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी सांगितले.