16 वर्षीय सोशल मिडीया इन्फ्ल्यूएन्सरने आईच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली

मध्य प्रदेश राज्यातल्या उज्जैन शहरातील 16 वर्षीय मेकअप आर्टीस्ट आणि सोशल मिडीया इन्फ्ल्यूएन्सर प्रियांशू यादवने आईच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.  प्रियांशू यादव (वय 16 वर्षे) हा उज्जैन पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकत होता. त्याची आई प्रीती आणि वडील राजेंद्र यादव यांचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तेव्हापासून प्रियांशू हा त्याच्या आईसोबतच राहत होता. प्रियांशू एक सोशल मिडीया इन्फ्ल्यूएन्सर होता आणि त्याला मुलींसारखे कपडे घालणे आवडायचे. इन्स्टाग्रामवर त्याचे 40 हजार फॉलोअर्स असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून तो मेकअप आणि सुंदर कसे दिसावे याबाबतची माहिती द्यायचा

दिवाळीच्या दिवसांमध्ये साडी घालून त्याने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली होती. त्या पोस्टला 4000 पेक्षा अधिक लोकांनी ट्रोल केलं आणि मोठ्या प्रमाणात वाईट कमेंट केल्या होत्या. प्रियांशूला हे ट्रोलिंग जिव्हारी लागलं होतं. हा अपमान असह्य झाल्यामुळे प्रियांशूने टोकाचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

नागझरी पालीस ठाण्याचे प्रभारी के एस गेहलोत यांनी सांगितले की, “आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रियांशूच्या मोबाईलचा तपशील तपासला जात असून यात त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवर त्याने स्वत:चे मेकअप करताना, हाताला नेलपॉलिश लावल्याचे आणि मुलींसारखे दागिने घालतानाचे अनेक व्हिडीओ पोस्ट केल्याचे दिसून आले आहे त्याच्या या पोस्टवरही काही लोकांनी अश्लील प्रतिक्रिया दिल्या होत्या.”

लोकांनी ट्रोल केल्यामुळे प्रियांशूने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावे असा पोलिसांना संशय आहे. प्रियांशूच्या मृत्यूमुळे त्याच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच LGBTQ+ समुदायाच्या अनेक सदस्यांनी प्रियांशूला श्रध्दांजली वाहत दु:ख व्यक्त केले.