
युक्रेनने आता पुन्हा एकदा रशियावर हल्ला केला असून त्यात 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. मागच्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. अशात कधी रशिया युक्रेनवर हल्ला करतं तर कधी युक्रेन रशियावर हल्ला करत आहे.
मीडिया वृत्तानुसार, रशियाचे नेते डॅनिश पुशिलिन म्हणाले की, डोनेटस्कच्या बाहेरील बाजारात रविवारी युक्रेनने अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात 27 लोकांचा मृत्यू झाला. तर दोन लहान मुलांसह 25 लोकं गंभीर जखमी झाले. पुशिलीन यांनी सांगितले की, बाजारात युक्रेनी तोफखान्यातून अनेक गोळे डागले होते. जे युक्रेनमधील कुराखोव्ह आणि क्रास्नोहोरिव्हका येथून डागले होते. मात्र, युक्रेनची राजधानी असलेल्या कीवने अद्याप या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. डोनेट्स्क हे युक्रेनच्या चार प्रदेशांपैकी एक आहे जे मॉस्कोने ताब्यात घेतले होते. रशियाच्या विदेश मंत्रालयाने या हल्ल्यासाठी युक्रेनला दोषी ठरवले आहे. त्यांनी याला दहशतवादी हल्ला असे म्हंटले आहे. डोनेट्स्कच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारीच रशियाच्या उस्ट-लुगा बंदरातील केमिकल ट्रान्सपोर्ट टर्मिनलमध्ये दोन स्फोट झाले, ज्यामुळे आग लागली. कंपनीने आगीसाठी युक्रेनला जबाबदार धरले आहे. बंदरातील कामकाज ठप्प झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
युक्रेनच्या सैन्याने डिसेंबर 2023 च्या उत्तरार्धात रशियन शहर बेल्गोरोद वर बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात लहान मुलांसह 25 जणांचा मृत्यू झाला होता. रशियन अधिकार्यांच्या निवेदनानुसार, बेल्गोरोडवर क्लस्टर बॉम्बने हल्ला करण्यात आला. युक्रेनमधील हल्ल्यात 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बेल्गोरोड शहर उत्तर युक्रेनच्या सीमेजवळ आहे. मॉस्को, ओरिओल, ब्रायन्स्क आणि कुर्स्क प्रदेशांच्या आकाशातही ड्रोन दिसल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.





























































