
रशिया आणि यूक्रेनमधील युद्धाला आता बराच काळ उलटला आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात यूक्रेनचे 9 हजारांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. हे युद्ध फक्त मानवासाठीच नव्हे तर निसर्गातील घटकांसाठीही हानिकारक ठरताना दिसत आहे. कारण, काळ्या समुद्रातील पाच हजारहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू झाला आहे.
यूक्रेनच्या दक्षिण ओडेसा येथील तुजली लॅगून नॅशनल पार्क येथे काम करणारे जैववैज्ञानिक इवान रुसेव यांनी एका शोधावेळी ही आकडेवारी जाहीर केली आहे. रशिया आणि यूक्रेनच्या युद्धात काळ्या समुद्रातील पाच हजारांहून अधिक डॉल्फिन मृत्युमुखी पडले आहेत. याचं कारण, युद्धावेळी वापरले जाणारे बॉम्ब किंवा अन्य विस्फोटकं नाहीत.
डॉल्फिन्सच्या मृत्युचं कारण पाणबुड्या आहेत. युद्धासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणबुड्यांमध्ये सोनार यंत्रणा बसवण्यात येते. या यंत्रणेमधून जी कंपन बाहेर पडतात, त्यामुळे शत्रुची पाणबुडी किंवा माईन्स यांचा माग काढता येतो. पण, या कंपनांमुळे डॉल्फिनना त्रास होतो. त्यांच्या अवयवांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याने डॉल्फिनचा मृत्यू झाला आहे.
यातील अनेक डॉल्फिन खोल समुद्रतळाशी बुडून गेले आहेत. फक्त काही टक्केच डॉल्फिन समुद्राच्या काठाशी येऊ शकले आहेत. त्यामुळे अशा घटनांविषयी माहिती कळू शकली आहे.



























































