युक्रेनचे दुसऱ्यांदा विभाजन होऊ देणार नाही, युद्ध संपवण्यासाठी जमीन देणार नाही; झेलेन्स्की यांनी स्पष्टच सांगितलं

युक्रेनचे दुसऱ्यांदा विभाजन होऊ देणार नाही, युद्ध संपवण्यासाठी जमीन देणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले आहेत. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, शांतता केवळ युद्ध न्याय्य पद्धतीने संपवूनच मिळू शकते, रशियाला जमीन देऊन नाही.

रशियाने 2014 मध्ये युक्रेनच्या क्रिमिया प्रायद्वीपावर कब्जा केला होता आणि सध्या युक्रेनच्या सुमारे 20 टक्के भूभागावर रशियाचे नियंत्रण आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार प्रदेशांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये रशियन सैन्याने कब्जा न केलेले क्षेत्रही समाविष्ट आहे. तसेच, युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याची इच्छा सोडून द्यावी, अशीही त्यांची अट आहे.

झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या घटनेनुसार देशाच्या भौगोलिक अखंडतेचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, “युक्रेनच्या भूभागाबाबतचा प्रश्न आमच्या घटनेत स्पष्ट आहे. कोणीही यापासून मागे हटणार नाही आणि हटू शकणार नाही. युक्रेनियन आपली जमीन आक्रमकांना भेट देणार नाहीत.”