गाडी लावण्यासाठी हप्ता देण्याचा वाद, उल्हासनगरात गोळीबार दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परिसरात गाडी लावण्यासाठी हप्ता देण्याच्या वादातून उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात आज रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, कैलास कॉलनी भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मोटरसायकल वरून आलेल्या टोळक्याने वीस राऊंड फायर केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हप्ता मागण्याच्या पूर्वीच्या वादातून हल्लेखोरांनी अनिल चव्हाण, अमन चव्हाण आणि अर्जुन चव्हाण यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात तिघेही गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने उपचारासाठी सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अनिल चव्हाण आणि अमन चव्हाण या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर अर्जुन चव्हाण याच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्लेखोरांना शोधण्यासाठी तीन विशेष पथके

पोलिसांची तीन विशेष पथके आरोपींचा शोध घेत असून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.