गाझा युद्धबंदी प्रस्ताव रद्द, संयुक्त राष्ट्र बैठकीत अमेरिकेने वापरला विटो अधिकार

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध दोन महिन्यांपासून सुरू आहे. गाझामध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने आणलेला प्रस्ताव अमेरिकेमुळे रद्द करावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी यूएनच्या चार्टरच्या आर्टिकल 99 चा वापर करीत हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मांडला होता. या प्रस्तावात गुटेरेस यांनी यूएनएससीची तत्काळ बैठक बोलावून गाझामध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात यावी, सर्व बंधक बनवलेल्या नागरिकांना बिनशर्त सोडण्यात यावे अशी मागणी केली होती; परंतु अमेरिकेने या प्रस्तावावर विटोचा वापर केल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. यूएनएससीच्या पाच स्थायी सदस्यांकडे विटोचे अधिकार आहे.

युद्ध रोखण्यासाठी आणलेल्या प्रस्तावावर विटोचा वापर करताना अमेरिकेने म्हटले की, हा प्रस्ताव वास्तविक स्थितीला धरून नाही. एएफपीच्या रिपोर्टमध्ये हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, आतापर्यंत या युद्धात पॅलेस्टाईन क्षेत्रामध्ये 17 हजार 487 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात जास्तीत जास्त महिला आणि छोटय़ा मुलांचा समावेश आहे. इस्रायलने 7 ऑक्टोबरला अप्रत्यक्षित हल्ल्यानंतर हमासला संपवण्याचा निर्णय घेतला होता. इस्रायलच्या म्हणण्यानुसार गाझाच्या सीमेवरून दहशतवादी त्यांच्या सीमेत घुसले आणि त्यांनी जवळपास 1200 लोकांची हत्या केली, लोकांना बंधक बनवले. यात 138 अद्याप कैद आहेत. गाझाच्या मोठय़ा क्षेत्राला टार्गेट करीत तेथे नासधूस केली. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, जवळपास 80 टक्के पॅलेस्टाईन लोकसंख्येला आपल्या जमिनीवरून हटवले आहे. लोकांना जेवायला मिळत नाही, तेल, पाणी आणि औषधांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

प्रस्तावाच्या बाजूने 13 देश

संयुक्त राष्ट्रात आणलेल्या या प्रस्तावाच्या बाजूने 13 देशाने मतदान केले. तर अमेरिकेने विटाचा वापर केला. ब्रिटनने मतदानात भाग घेतला नाही. चीन आणि रशिया या देशाने अमेरिकेच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. रशियाने अमेरिकेला हर्टलेस म्हटले. ब्राझीलने म्हटले की, तत्काळ युद्धविराम झाला नाही तर खूप मोठे नुकसान होईल. तर पॅलेस्टाईन राजदूताने हा प्रस्ताव नाकारल्याने विनाशकारी म्हटले आहे.
z यूएन सिक्योरिटी काऊन्सिलमध्ये एकूण 15 सदस्य आहेत. यात पाच स्थायी आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. स्थायी सदस्यांत चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. तर अस्थायी सदस्यांमध्ये अल्बानिया, ब्राझील, इक्वेडोर, गबन, घाना, जपान, माल्टा, मोंजाबिक, स्वित्झर्लंड आणि यूएई या देशांचा समावेश आहे.

24 तासांत 450 जागांवर इस्रायलचे हल्ले
इस्रायली सैन्यांनी अवघ्या 24 तासांत 450 ठिकाणांवर हल्ले केले आहेत. इस्रायलने त्यांची स्ट्राइक फुटेजही दाखवले आहेत. हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या 24 तासांत गाझा शहरात जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाला आहे,पॅलेस्टाईन तर जबालियामध्ये डझनहून जास्त लोक मारले गेले आहेत.