अपराजित हिंदुस्थान जगज्जेतेपदाच्या षटकाराच्या दिशेने, आज अफगाणिस्तानविरुद्ध उपांत्य लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी युवा वर्ल्ड कपमध्ये विजयाची घोडदौड सुरू असलेला अपराजित हिंदुस्थान आता जगज्जेतेपदाचा षटकार ठोकण्याच्या तयारीत आहे. बुधवारी रंगणाऱ्या उपांत्य लढतीत हिंदुस्थानसमोर अफगाणिस्तानचे आव्हान असून सहाव्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने वेगवान प्रवास सुरू केला आहे.

या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत हिंदुस्थानने प्रतिस्पर्ध्यांवर संपूर्ण वर्चस्व गाजवत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आत्मविश्वास, अनुभव आणि संघातील संतुलन पाहता हा सामना हिंदुस्थानसाठी जगज्जेतेपदाकडे टाकलेले आणखी एक दमदार पाऊल असेल.

विजयासाठीच खेळणारा हिंदुस्थान

सुपर सिक्स फेरीत चिर-प्रतिद्वंद्वी पाकिस्तानला 58 धावांनी पराभूत करत हिंदुस्थानने आपले उंचावलेले मनोधैर्य अवघ्या जगाला दाखवले. या दणदणीत विजयाने संघाचा आत्मविश्वास शिखरावर पोहोचला असून उपांत्य सामन्यातही तोच आक्रमक सूर कायम ठेवण्याचा निर्धार युवा खेळाडूंनी बोलून दाखवला आहे.

इंग्लंड तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 27 धावांनी मात करत गतविजेत्यांना स्पर्धेबाहेर केले. क्विन्स स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या सामन्यात थॉमस रियूच्या 110 धावांच्या दमदार खेळीमुळे इंग्लंडने 277 धावा उभारल्या होत्या. तर धावांचा पाठलाग करताना ऑलिव्हर पीकच्या झुंजार शतकानंतरही ऑस्ट्रेलिया 250 धावांत गारद झाला. या विजयासह इंग्लंडने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली.

विहान मल्होत्रा म्हणजे सामना फिरवणारा योद्धा

अष्टपैलू विहान मल्होत्रा हा हिंदुस्थानचा ट्रम्प कार्ड ठरतोय. फलंदाजीतील शतकासह त्याचे अष्टपैलू योगदान संघासाठी निर्णायक ठरले आहे. उपांत्य फेरीतही त्याच्याकडून सामना फिरवणाऱया कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार आयुष म्हात्रे गोलंदाजीत सातत्य राखत असून, वेगवान गोलंदाज हेनिल पटेल आणि आर. एस. अंबरीश यांनी प्रत्येकी 11 विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांची फलंदाजी उद्ध्वस्त केली आहे. फिरकीत खिलान पटेलची भेदक कामगिरी हिंदुस्थानला अतिरिक्त धार देणारी ठरतेय. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध हिंदुस्थानची कामगिरी जोरदार असेल याबाबत कुणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही.