प्रेयसीशी बोलण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटलं, भरधाव कारने सहा जणांना चिरडलं

फोनवर प्रेयसीसोबत बोलण्याच्या नादात प्रियकराचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. यामुळे भरधाव कारने सहा टीसींना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टीसींना चिरडल्यनंतर कार बसस्टॉपमध्ये घुसली. यात बसस्टॉपचेही नुकसान झाले आहे. अपघातात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले.

दिल्लीतील द्वारका सेक्टर 21 मधील अंडरपासजवळ हा अपघात घडला. कारचालक ड्रायव्हिंग करता करता प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता. यादरम्यान त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित भरधाव कार बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या सहा टिसींना चिरडत बसस्टॉपमध्ये घुसली. अपघातात चार टिसी किरकोळ तर दोन टिसी गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले असून गंभीर जखमींना सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलिसांनी कार जप्त केली आहे. पोलीस बसस्टॉपजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. फरार चालकाचा शोध सुरू आहे.