IFFI 2023- चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल माधुरी दीक्षितचा गौरव

54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सोमवारपासून गोव्यात सुरुवात झाली. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ‘बॉलीवूडची धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.

ब्रिटिश चित्रपट निर्माते स्टुअर्ट गॅट यांच्या ‘पॅचिंग डस्ट’ या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रीमियरने या नऊ दिवस चालणाऱ्या महोत्सवाची सुरुवात झाली. प्रथमच इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट वेबसीरिज पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यासाठी 10 भाषांमध्ये एकूण 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. यंदा इफ्फीमध्ये 40 महिला चित्रपट निर्मात्यांचे उल्लेखनीय चित्रपट प्रदर्शित केले जातील. या वर्षीचा प्रतिष्ठsचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हॉलीवूड अभिनेते, निर्माते मायकेल डग्लस यांना जाहीर झाला असून महोत्सवाच्या सांगता समारंभामध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

आपल्या चित्रपटाचे हिंदुस्थानात चित्रीकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत 30 टक्क्यांवरून 40 टक्के करण्यात आल्याची घोषणा अनुराग ठाकूर यांनी यावेळी केली.