महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला! – नितीन गडकरी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्ती केली जात आहे. मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला असून महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला, अशी प्रतिक्रिया एक्स (ट्विटर) अकाउंटवरून दिली.

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती”, असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्ष पदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती. मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली…!”, असे ट्विट शरद पवार यांनी केले.

“दुःखद! महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आज पहाटे हरपला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले. शिवसेनेने महाराष्ट्राला दिलेले ते पहिले मुख्यमंत्री. शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा ‘शिवसेना काल-आज-उद्या’ या पुस्तक रुपात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्यही केले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असे ट्विट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.