
मंत्रीपद स्वीकारल्यापासून माझे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे मला पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळायचे आहे, असे विधान केंद्रीय मंत्री आणि केरळच्या त्रिशूर मतदारसंघातील खासदार सुरेश गोपी यांनी केले आहे. रविवारी कन्नूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश गोपी यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली.
सुरेश गोपी हे मल्याळम चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते असून केरळमधून निवडून आलेले भाजपचे एकमेव खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सीपीआयच्या व्हीअस सुनीलकुमार यांचा 70 हजारहून अधिक मतांनी पराभव केला. 9 जून 2024 रोजी त्यांनी मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे पर्यटन आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.
मला माझी अभिनय कारकीर्द पुन्हा सुरू करायची आहे. मला अधिक उत्पन्नाची गरज आहे. मंत्री झाल्यानंतर माझे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे, असे सुरेश गोपी म्हणाले. तसेच मी मला मंत्री करण्याचीही विनंती केली नव्हती. मला चित्रपटसृष्टीतील माझी कारकीर्द सुरू ठेवायची असून माझ्या जागी राज्यसभा खासदार सी. सदानंदन मास्टर यांना मंत्रीपद दिले पाहिजे, असे मी स्पष्ट केले होते, असेही ते म्हणाले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, सुरेश गोपी यांनी तमिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषेतील 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. 1965 मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1992 ते 1995 दरम्यान त्यांना सुपरस्टार ही पदवी मिळाली. 1998 ला त्यांना नॅशनल अवॉर्ड आणि केरळ राज्य पुरस्कार मिळाला.