गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जि. प. समोर सरणावर उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील सरपंच उषा संभाजी नरके यांच्या मनमानी कारभाराची आणि गैरव्यवहाराची चौकशी करावी, त्यांना बडतर्फ करण्यात यावे आणि गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज मंगळवारी पाच ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर सरणावर झोपून आंदोलन केले.

सरपंच उषा नरके आणि ग्रामविकास अधिकारी पी. डी. मोरे यांनी लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले. गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा ठपका ठेवत आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आली. सरपंच उषा नरके आणि ग्रामविकास अधिकारी पी. डी. मोरे यांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी सरपंच प्रभा निकाळजे, रामदास खवले, दिलीप नरके, प्रयाग राऊत, सोनाली नरके हे ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसले आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी या उपोषणाची तात्काळ दखल घेत उपोषणस्थळी धाव घेतली. सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना आठ दिवसांत अहवाल मागवून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सरणावर कफन पांघरून उपोषण करणारे रामदास खवले सरणावरून उठले.