Innovation – कमी प्रदूषण, जास्त मायलेज; नाशिकच्या मयूरने बनवले अनोखे एअरफिल्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल महाग झालंय यावर आपण चर्चा करतो. पण यावर मार्ग काढण्यासाठी नाशिकच्या मयूर पाटील या मेकॅनिकल इंजिनीअरने खास एअरफिल्टर बनवले आहे. त्यामुळे गाडीचे मायलेज प्रति लिटर  10 ते 20 किलोमीटर इतके वाढते. तसेच 40 टक्के वायू प्रदूषण कमी करण्याचा दावाही मयूरने केला आहे.

2008 साली मयूर पाटील इंजिनीअरिंग शिकण्यासाठी पुण्यामध्ये आला होता. त्याने एका गॅरेजवर ट्रेनी टेक्निशियन म्हणून काम केले आणि त्या कमाईतून जुनी बाईक घेतली. ही बाईक कमी मायलेज देत होती. मयूरने त्याचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षण आणि गॅरेजचा अनुभव यांच्या बळावर बाईकचे ऍव्हरेज 20 किलोमीटरने वाढवला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या या एअरफिल्टरमुळे गाडीतून होणारे कार्बन उत्सर्जनही कमी झालंय.

मयूरकडे एक उत्तम संकल्पना होती. त्यावर अधिक संशोधनाची गरज होती. त्यासाठी पैसे लागणार होते. 2015-16 दरम्यान आयआयएम अहमदाबादमध्ये ‘पॉवर ऑफ आयडिया’ नावाची एक स्टार्टअपसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये त्याने भाग घेतला आणि पाच लाखांचे बक्षीस जिंकले. त्याने पुण्यात स्टार्टअप सुरू केलेय.

2015 पासून एअर फिल्टर बनण्याचे काम मयूरने  सुरू केले. त्याला एअर फिल्टर बनवायला तीन वर्षे लागली. हे एअर फिल्टर सगळ्या गाडय़ांमध्ये वापरू शकतो. अगदी बुलेटसारख्या गाडय़ांचेही मायलेज वाढवू शकतो. 

मयूरच्या कंपनीला स्टार्टअपची अनेक पारितोषिके मिळाली आहेत. अलीकडेच त्याने कर्नाटकच्या एसटी महामंडळाच्या 10 बसवर एअर फिल्टर लावले आहेत. केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेचा फायदा घेत स्वतःची कंपनी सुरू केली. प्रोडक्टचे पेटंटही घेतले.