पाथर्डीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, झेंडू लागवड करत केली कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय व जैविक पद्धतीने झेंडू लागवड करून विक्रीचे यशस्वी नियोजन करत तब्बल 45 हजार रुपयांच्या फुलांची विक्री केली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झेंडू या फुलझाडाच्या रोपांची बेड पद्धतीने मल्चिंग पेपरवर लागवड केली.

विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी रोपवाटिका व्यवस्थापन , फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान हा विषय शंभर गुणांच्या प्रात्यक्षिकासाठी अंतर्भूत केलेला असल्याने त्यांनी हा उपक्रम राबवला. त्यासाठी झेंडू फुलझाडाच्या चार हजार रोपांची लागवड 5 ऑगस्ट 2023 रोजी केली. दसरा व दिवाळी सणाच्या दिवशी फुलांच्या मार्केटला असणाऱ्या बाजारभावाचा विचार करून ही लागवड करण्यात आली . लागवड करताना सुप्रीम व यलो एक्सप्रेस प्लस या जातींचा वापर करण्यात आला. झेंडू रोपे लागवडीसाठी बेड बनवणे, बेडवर शेणखत पसरविणे, ठिबक सिंचन संचाची जोडणी करणे, मल्चिंग पेपर पसरविणे , रोपांची बेडवर लागवड करणे , सेंद्रिय स्लरी सोडणे , ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ड्रिंचिंग करणे ,रोपांचे शेंडे खुडणे , सेंद्रिय खतांचे नियोजन करणे , अंतर्मशागतीची कामे करणे , कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी करणे तसेच फुलांची तोडणी व मार्केटिंगचे काम सुद्धा कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले.विशेष म्हणजे या फुलांचे उत्पादन घेण्यासाठी संपूर्णपणे जैविक व सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्यात आला . फुलांच्या विक्रीचे नियोजन करताना दसरा सणाच्या तीन दिवस अगोदर कासार पिंपळगाव , वृद्धेश्वर कारखाना , दादापाटील राजळे महाविद्यालय , कॉलेज ऑफ फार्मसी येथे माहितीपत्रकाद्वारे झेंडू फुलांच्या विक्री बाबत माहिती देण्यात आली .

प्रति किलो 50 रुपये प्रमाणे फुलांची विक्री करण्यात आली . यावेळी विद्यार्थिनींनी झेंडु फुलापासून हार सुद्धा बनवले. एकूण सहा मुलींनी चाळीस हार बनवून त्यांची विक्री विद्यालय परिसरात केली. शंभर दिवसाच्या या प्लॉटमधून आलेल्या फुलांच्या विक्रीतून 45 हजार 100 जमा झाले . विक्रीसाठी कृषी तंत्र विद्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी दादा पाटील राजळे महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग तसेच संगणक विभागातील विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले . कृषी तंत्र विद्यालयाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे,प्राचार्य सुनिल पानखडे, सचिव, विश्वस्त व परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले आहे .