
सामना प्रतिनिधी, कवठे येमाई
एकीकडे तीव्र झालेली पाणीटंचाई व दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने संकटात सापडलेला शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत असताना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रात्रीच्या सुमारास शेतकरी एकनाथ भिकाजी गोसावी यांची कांद्याची वखार अज्ञात समाजकंटकाने पेटवून दिल्याची घटना घडलीय. यामध्ये त्यांच्या दोनशे पिशवी कांदा व वखारीचे असे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा परिसरातील शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपरखेड येथे पारगाव रस्त्यालगत शेतकरी एकनाथ भिकाजी गोसावी यांची कांद्याची वखार आहे. रात्री पावने बारा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या हर्षद बोऱ्हाडे यांना कांद्याच्या वखारीला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी रहात असलेल्या नरेश सोनवणे व शेतकऱ्यांनी वखारीकडे धाव घेतली. लाकूड, बांबू, व ऊसाच्या पाचट व प्लॅस्टिक कागद यापासून तयार केलेल्या वखारीला आगीने काही मिनिटात वेढा दिल्याने आग विझवणे कठीण होते. यामध्ये संपूर्ण वखारीचे नुकसान होऊन दोनशे पिशवी कांदा होरपळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.




























































