
महिला आणि मुलींवर अनन्वित आणि क्रूर अत्याचाराच्या उत्तर प्रदेशातून एकामागोमाग एक रोज नव्या घटना उजेडात येत आहे. बरेलीमध्येही एक अत्यंत भयानक प्रकार घडला आहे. बलात्कार गुपचूप सहन केलेल्या आणि त्यातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीची तिच्या बापाने आणि भावाने मिळून हत्या केली आहे. या दोघांनी तिचा मृतदेह एका नदीत फेकून दिला होता. शाहजहांपूर गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून बापाला अटक केली आहे. मुलीचा भाऊ हा अद्याप फरार आहे.
16 वर्षांच्या या मुलीवर कोणीतरी बलात्कार केला होता. शिक्षण न घेतलेल्या या मुलीचं आयुष्य घराच्या चार भिंतीपुरताच मर्यादीत होतं. फारसं न बोलणारी ही मुलगी बलात्कारानंतर बोलायचीच बंद झाली होती. बलात्काराची गोष्टही तिने घाबरून घरी सांगितली नव्हती, यामुळे ती गर्भवती राहिली. ही बाब अख्ख्या गावाला कळाली, आणि त्यांनी याबाबत उलट सुलट बोलायला सुरुवात केली.या प्रकारामुळे आपली गावात बदनामी होणार अशी भीती मुलीच्या बापाला सतावायला लागली होती. यामुळे त्याने मुलीचा गळा आवळून खून केला. यामध्ये मुलीच्या भावानेही बापाची मदत केली होती.
शाहजहांपूरची वरिष्ठ अधीक्षक एस आनंद यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना म्हटले की मुलीचा खून केल्याचे तिच्या वडिलांनी कबूल केले आहे. लोकांनी मुलगी गर्भवती राहिल्याने आपली बदनामी करायला सुरुवात केली होती, ज्यामुळे आपण मुलीची हत्या केली असं बापाने म्हटलं आहे. या मुलीवर बलात्कार कोणी केला होता, हे देखील कळू शकलेलं नाहीये. मुलीने तिच्यासोबत झालेल्या अतिप्रसंगाबाबत कुठेच वाच्यता केली नव्हती ज्यामुळे तिच्यावर बलात्कार करणारा कोण आहे याचा शोध लागू शकला नव्हता. पोलीस आता या आरोपीचाही शोध घेत आहेत. ही मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत राहात होती आणि 23 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. ती बेपत्ता झाल्याची तिच्या कुटंबातील कोणीही तक्रार दिली नव्हती.


























































