
अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र झोपडीधारकांना धारावीबाहेर भाडेतत्त्वावर घरे देण्यात येणार आहे. मात्र, धारावीतील अपात्र व्यावसायिकांना आता धारावीतच भाडेतत्त्वावर गाळे देण्यात येणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून (डीआरपी) राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
धारावी पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात अपात्र झोपडीधारकांचे धारावीबाहेर पुनर्वसन केले जाणार आहे. आता धारावीतील अपात्र व्यावसायिकांचे धारावीतच भाडेतत्त्वावर पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र, अपात्र व्यावसायिकांचे धारावीतच मोफत पुनर्वसन करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. दरम्यान, पात्र-अपात्र असा खेळ खेळू नका. सरसकट सर्व व्यावसायिकांना धारावीतच मोफत गाळे द्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पुनर्विकास होऊ देणार नाही, असा इशारा बिझनेसमन वेल्फेअर असोसिएशनचे समीर मंगरू यांनी दिला आहे.
पुनर्विकसित इमारतीत जागा देणार
अपात्र व्यावसायिकांना धारावीतच भाडेतत्त्वावर गाळे दिले जाणार आहेत पण त्याचबरोबर अपात्र व्यावसायिकाला ही जागा खरेदी करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक पुनर्विकसित इमारतीत 10 टक्के व्यावसायिक जागा राखीव ठेवली जाणार आहे. हीच जागा अपात्र व्यावसायिकांना दिली जाणार आहे.