स्मृतिगंध – असामान्य व्यक्तिमत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्षा चोपडे 

वक्तृत्वावर उत्तम पकड, नाटककार, अभिनेता, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, ज्यांच्या विनोदी साहित्याने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला भाग पाडणारे असे नानाविध पैलू असलेले व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे! पुल या दोन अक्षरांचे गारूड आजही कायम आहे. 12 जून या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना केलेले अभिवादन…

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे ऊर्फ भाई! लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक… त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले. त्यांच्या पहिल्या पत्नी सुंदर दिवाडकर यांचे लग्नानंतर लगेच निधन झाले. त्यानंतर त्यांनी सहकारी सुनीता ठाकूर यांच्याशी विवाह केला. हिंदुस्थानी शास्त्राrय संगीतात ते पारंगत होते. त्यांनी 1940 आणि 50च्या दशकातील अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले. ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा आणि आशा भोसले यांसारख्या गायकांनी गायलेल्या ‘भावगीत’ प्रकारातील अनेक लोकप्रिय गैरफिल्मी गाण्यांचे ते संगीतकार होते.

पु. ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. पु. ल. देशपांडे हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांचे शेकडो विनोदी किस्से आहेत. कुठेतरी वाचलेला हा किस्सा. एकदा एका समारंभात पु. ल. देशपांडेंच्या पत्नीचे कौतुक करताना वसंतराव देशपांडे म्हणाले, “ही मुलगी (सुनीता देशपांडे ) म्हणजे एक रत्न आहे.” यावर पु. ल. तत्काळ म्हणाले, “म्हणून तर गळय़ात बांधून घेतले आहे.” यावर त्यांच्या हजरजबाबीपणाचे नेहमीप्रमाणे कौतुक झाले होते.

पु. ल. देशपांडे यांनी पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना सेना-भाजप सरकारने स्थापन केलेल्या सरकारवर कडाडून टीका केली. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी एका जाहीर कार्पामात पु. ल. देशपांडे यांच्यावर जोरदार प्रहार केला. शाब्दिक चकमकी, विरोध, नाराजी हा राजकारणाचा भाग असला तरी पु. ल. देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरेंचे संबंध सलोख्याचे होते. बाळासाहेब ठाकरेंचं शिक्षण जिथे झाले त्या ओरियंट हायस्कूलमध्ये पु. ल. देशपांडे शिक्षक होते. पु. ल. देशपांडे आजारी असताना बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी पुलंची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. शब्दांचे जादूगार आणि भाषेचे जादूगार, दोघेही जुने गंगार्पण करून प्रेमाने भेटले.

‘गुळाचा गणपती’ या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. यात त्यांनी  केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे ‘सब कुछ पु. ल. देशपांडे’ असा हा चित्रपट आहे! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला, पण पु. ल. देशपांडेंची कमाई काय? तर पुण्यात ‘गुळाचा गणपती’ प्रदर्शित झाला तेव्हा तो पाहण्यासाठी पु. ल. देशपांडेंना साधे आमंत्रणसुद्धा नव्हते. पु. ल. देशपांडे, सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला.

‘गुळाचा गणपती’ म्हणजे आजच्या  समाजजीवनाचे उमटलेले प्रतिबिंब! घडय़ाळाशी बोलणारा पुस्तकवेडा, नाटकवेडा भोळा नारायण गोविंद कापसे त्यांनी मोठय़ा ताकदीने साकारलाय. त्यांचा अप्रतिम अभिनय व नळासोबत असलेला संवाद आणि निरागस भाव उत्तम भासतात. नळास ते म्हणतात, “रडतोस काय लेका, दोन (कळश्या) भरून दिल्यास तर मरणार का?” लीलेवर चोरटे प्रेम करणारा आणि घरभर पाणी झाल्यावर घरातील भाकरी तरंगताना बघून, “पाहिलेस लीले, पाणी दिले  आणि अन्न घेऊन चालला देव,” असे बोलणारा नाऱया आपल्यापैकी एक वाटतो. “कागदाचा उपयोग पुडय़ा बांधण्यासाठी होतो.” हे सांगणारे तात्या आणि पानाच्या तानाजीचा पोवाडा ऐकल्यावर जेव्हा पानपट्टीवाला नाऱयाला “पान खा” म्हणतो तेव्हा तो म्हणतो, “पोवाडा ऐकला ना आताच, तानाजी कधी पान खात होता का?” असा प्रतिप्रश्न करतो. शूरवीरांचे सद्गुण अंगी बाळगावे ही शिकवण तो नकळत देऊन जातो. तानाजीचे पोस्टर बघून तसाच जोश अंगात संचारणे व एका महिलेची किंकाळी आणि मदतीची हाक ऐकून “मर्द मराठा जिवंत असताना तुझ्या केसाला हात लावायची कुणाची छाती नाही,” असे म्हणत मदत करणारा नाऱया आजच्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी वाटतो.

सुदर्शन हा धूर्त माणूस जेव्हा नाऱयाला गुळाचा गणपती किंवा आपल्या स्वार्थासाठी बळीचा बकरा बनवतो, तेव्हा त्याची होणारी घालमेल आणि पोट धरून हसवणारे प्रसंग पु. ल. देशपांडेंच्या अभिनयाची उंची दर्शवतात. बावळट, पण सुविचारांची जळती मशाल असलेला नाऱया समाजातील भोळय़ा लोकांचा प्रतिनिधी वाटतो. ाढांतिकारी नेता समजून नाऱयाला मान देणारे लोक कसे खोटय़ा लिखाणास बळी पडतात आणि पैसा दान करतात व त्या पैशाचा वापर धूर्त सुदर्शन कसा वैयक्तिक खर्चासाठी करतो हे बघताना समाजाला लुबाडणारे आणि हातचा बाहुला करून राजकारणासाठी वापरणारे काही राजकारणी किती हीन वृत्तीचे असतात हे दिसून येते. मुख्य म्हणजे पु. ल. देशपांडेंनी शेवट मस्त लिहिलाय. धूर्त अपराध्याला शिक्षा आणि बळीचा बकरा झालेला नारायणची सुटका व त्या काळात न्यायदेवता किती योग्य प्रकारे काम करायची हे दिसून येते. शेवटी नाऱयाला न्यायाधीश म्हणतात, “भोळेपणा घेऊन जन्माला आलास हा तुझा अपराध.” धूर्त लोकांना शिक्षा आणि गुळाचा गणपती केलेल्या नारायणची सुटका होते आणि लीलेशी लग्न करून या चित्रपटाचा शेवट होतो. भाईंनी या चित्रपटाचे लेखन करताना समाज आणि त्यातील ‘कॉमन मॅन’ आणि सामान्य भोळय़ा नारायणाला मिळणारा न्याय व न्यायव्यवस्था कशी असावी असे दाखवले आहे.

‘अभंग गीतांजली’ या शीर्षकाने त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चा मराठीत अनुवाद केला होता. त्यांनी दूरदर्शन वाहिनीसाठीही काम केले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भारतीय दूरचित्रवाणीवर मुलाखत घेणारे ते पहिले मुलाखतकार होते. वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी त्यांना बीबीसीमध्ये पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांनी फ्रान्स आणि पश्चिम जर्मनीमध्ये काही काळ घालवला. याच देशांतील आलेल्या अनुभवावर त्यांनी ‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णन लिहिले होते. पु. ल. देशपांडेंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. 2002 मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’ची स्थापना केली. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समर्थक होते. कामाप्रतीची निष्ठा आणि लेखनाचा दर्जेदारपणा भाईंना अद्वितीय यश आणि अनेक उच्च मानसन्मान देऊन गेला. महाराष्ट्राने देशाला बुद्धिवान रत्ने दिली त्यापैकी पु. ल. देशपांडे एक होते. आजही त्यांच्या लिखाणातील मिश्कील भाषाशैली व निर्मळ विनोद वाचले की, मनाची मरगळ दूर होते. मन आनंदाने न्हाऊन निघते आणि चेहऱयावर हास्य उमटते. अशा उत्तुंग लेखकाची  पुस्तके वाचायला हवीत. ‘वाचाल तर वाचाल’ हे आपले पूर्वज का सांगून गेले ते लक्षात घ्या.

पु. ल. देशपांडे यांना नमन!

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची-केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी आहेत.)