
उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. गुरुवारी निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर भाजपच्या 2 आमदारांनी आपल्या नावे विक्रम नोंदवल्याचे दिसून आले. साहिबाबाद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील कुमार शर्मा यांनी तब्बल 2,14,835 मताधिक्याने विजय मिळवला. देशातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक मताधिक्याने मिळविलेला विजय आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक मतदार असणाऱ्या नोएडा मतदारसंघात भाजप आमदार पंकज सिंह यांनी जागा कायम राखली. 2017 मध्ये पंकज सिंह यांना 1.4 लाख मताधिक्य मिळाले होते. यावेळी त्यांना 1.81 लाख मताधिक्य मिळवून विजय मिळवण्यात यश आले. सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार म्हणून सिंह हे सुनील कुमार यांच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांचे हे विक्रम एकाच दिवशी रचले गेले आहेत.
सुनील कुमार आणि पंकज सिंह या भाजप आमदारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा रेकॉर्ड मोडला आहे. अजित पवार यांना 2019 साली झालेल्या विधानसभेत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात 1.65 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. अजित पवारांचा हा विक्रम एका दिवसात दोनवेळा मोडला आहे.
मेरठ कॅंटमधील अमित अग्रवाल 1,18,072 मतांनी आणि आग्रा उत्तरमधील पुरुषोत्तम खंडेलवाल 1,12,370 मताधिक्याने विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर अर्बनमधून 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी जसवंतनगर मतदारसंघातून 90,979 मताधिक्याने विजय मिळविला.



























































