
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी ‘समाजवादी अत्तर’ लाँच केले आहे. 2022 च्या निवडणुका लक्षात घेऊन 22 नैसर्गिक सुगंधांमध्ये हे अत्तर लाँच झाले आहे. या अत्तराचा सुगंध 2022 च्या निवडणुकांमध्ये आपला असर दाखवेल. अत्तराच्या सुगंधावरूनच कोण येतेय हे लोकांना कळेल. 2024 ला 24 सुगंधांमध्ये अत्तर येईल, असे अखिलेश यादव यावेळी म्हणाले.
मायावती स्वबळावर!
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी मंगळवारी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी आम्ही ‘चुनावी समझोता’ करणार नाही. 2007च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले होते अगदी तसेच यावेळीही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपसाठी आरएसएस मैदानात
उत्तर प्रदेशात भाजपच्या योगी सरकारविरोधातील वातावरण लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता उघडपणे मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात तिरंगा यात्रा काढण्याची संघाने तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध कार्यक्रम आखल्याची माहिती पुढे आली आहे. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांशी लढणाऱया राणी लक्ष्मीबाई यांच्या 19 नोव्हेंबरच्या जयंतीपासून 16 डिसेंबर 1971ला हिंदुस्थानने पाकिस्तानवर विजय मिळवला होता, तोपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.




























































