
सामना ऑनलाईन। लखनौ
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे एका नराधम पित्याने आपल्या 19 वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर तिची निघृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या क्रूरकर्मा पित्याने आपले पकडले जाऊ या भितीने मुलीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर तिचे तुकडे केले व वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पण नातेवाईकांना संशय आला. त्यामुळे हे प्रकरण समोर आले. जय प्रकाश गुप्ता असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
त्याच्यावर भादंवि कलम 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26-27 जुलै रोजी घडली आहे. घरातून अचानक मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईक आणि शेजाऱ्यांना संशय आला व त्यांनी आरोपीला मुलीबद्दल विचारणा केली. त्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे देत सगळ्यांचीच दिशाभूल केली. पण 20 दिवस उलटले तरी मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीची कसून चौकशी केली असता तो सतत जबाब बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवला व मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. नंतर पोलिसांनी वेगवेगळ्या नाल्यातून तिच्या मृतदेहाचे तुकडे गोळा केले.

























































