जेवढा शिक्षित मुसलमान, तेवढा मोठा दहशतवादी; योगींचे मंत्री रघुराज सिंह यांचे विधान

उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी मुसलमान समाजाची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. जेवढा शिक्षित मुसलमान, तेवढा मोठा दहशतवादी असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा उल्लेख दहशतवाद्यांचे केंद्र म्हणून केला. सर्व दहशतवादी मशिदी आणि मदरशांमधून निर्माण झाले आहेत. त्यामुळे मशिदी आणि मदरसे बंद केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. ते मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.

दिल्ली बॉम्बस्फोटासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रघुराज सिंह म्हणाले की, आजपर्यंत पकडलेले सर्व दहशतवादी मदरशांमधून आलेले आहेत. त्यामुळे मदरसे आणि मशिदी ताबडतोब बंद करायला हव्यात, तर दहशतवादाच्या सापाचा फणा चिरडता येईल. मुस्लिम जेवढा शिक्षित तेवढा मोठा दहशतवादी असतो. ओलामा बिन लादेनही बी. टेक. किंवा एम. टेकचा विद्यार्थी होता. त्याने अमेरिकेवर हल्ला केला. हे लोक राक्षसांचे वंशज असल्याचेही ते म्हणाले.

रघुराज सिंह यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांना थेट फाशी देण्याचीही मागणी केली. फारूख अब्दुल्ला यांच्या कार्यकाळात दहशतवादी पोसले गेले. फारूख अब्दुल्ला दहशतवादाचे समर्क असून त्यांना फाशी देण्यात यावी. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या अशिक्षित लोकांना लुटून आपला महाल उभा केला, असेही ते म्हणाले.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची चौकशी करा

दरम्यान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची चौकशी करण्याची मागणीही रघुराज सिंह यांनी केली. एएमयूमध्ये बुरहान वाणी सारखे दहशतवादी जन्माला आले. मशि‍दींनाही टाळे लावले पाहिजे. मदरसेही बंद झाले पाहिजे. कारण हा हिंदुंचा देश असून मुस्लिम आक्रमकांनी आपल्याला लुटले आहे, असेही ते म्हणाले.